Shamonda Virus : नव्या शामोंडा व्हायरसने जगात प्रचंड खळबळ, एकाचा मृत्यू, उपचार उपलब्ध नसल्याने यंत्रणा अलर्ट, लागण कशी होते?
या विषाणूची मानवांना लागण होत नाही, असे अगोदर मानले जायचे. परंतु आता आता मानवामध्येही या विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर फ्रान्समध्ये यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

Shamonda Virus : जग कोरोना विषाणूच्या संकटातून सावरून पूर्ववत झाले आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील व्यापार, दळणवळण कधीकाळी ठप्प पडले होते. आता मात्र कोरोनाच्या हादरवून टाकणाऱ्या आठवणींना मागे टाकून जग पुढे चालले आहे. परंतु आता एका नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या या विषाणूने आता मानवांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या विषाणूची लागण झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झालाय. त्यामुळेच जगाचे टेन्शन वाढले आहे. या विषाणूचा प्रसार झाला तर पुन्हा एकदा कठीण काळ येऊ शकतो का? असा चिंता वाढवणारा प्रश्न विचारला जातोय.
विषाणूचे नेमके नाव काय? विषाणूची लागण कुठे झाली?
सध्या समोर आलेली ही घटना फ्रान्समधील आहे. फ्रान्समध्ये या विषाणूची लागण झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. या विषाणूचे म्हणजेच व्हायरसचे नाव शामोंडा असे आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर उपचार करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या विषाणूचा सामान्य लोकांना सध्यातरी धोका नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
विषाणूची लागण कशी होते?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कीटकाने चावा घेतल्यानंतर या विषाणूची लागण होते. गुरे चारणाऱ्यांना या विषाणूचा जास्त धोका आहे. गायींना या विषाणूची सर्वाधिक लागण होते. चावा घेणाऱ्या छोट्या कीटकांमुळेच या विषाणूचा जास्त संसर्ग होतो. या विषाणूची मानवांना लागण होत नाही, असे अगोदर मानले जायचे. परंतु आता आता मानवामध्येही या विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर फ्रान्समध्ये यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
विषाणू 1960 सालापासून अस्तित्त्वात
आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीला शामोंडा विषाणूची लागण ही पूर्व फ्रान्समध्ये झाली असावी. या भागात 2026 सालच्या वसंत ऋतुत तसेच उन्हाळ्यात या विषाणूची गुरांना मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. हा विषाणू 1960 सालापासून अस्तित्त्वात आहे. सर्वात अगोदर हा विषाणून नायजेरिया देशात आढळला होता. त्यानंतर आफ्रिका आणि जपान या देशातही हा विषाणू आढळला. आता युरोपमधील अनेक देशात हा विषाणू पसरलेला आहे.
दरम्यान, या विषाणूचा गर्भवती महिलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणताही उपचार, लस उपलब्ध नाही. त्यामुळे या विषाणूचे पुढे काय होणार? त्यावर उपचार शोधला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
