सोन्याची लंका अन्नाला ‘महाग’, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत

| Updated on: Apr 23, 2022 | 11:14 AM

श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. जागतिक बँक सध्या 60 कोटी डॉलर देणार आहे.महागाई गगनाला भिडली आहे आणि सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली आहे. तेल इतके महाग झाले आहे की वाहतूक खर्च ही परवडत नाही.

सोन्याची लंका अन्नाला महाग, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत
श्रीलंकेत महागाईचा विस्फोट
Follow us on

मुंबई : श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती (SriLanka Crisis ) अगदीच वाईट झाली आहे. ऐतिहासिक महाकाव्यात सोन्याची लंका म्हणून वर्णलेली श्रीलंका आज अन्नधान्याला महाग झाली आहे. या देशाला चहूबाजूंनी समस्यांनी वेढले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेतील चलनवाढीचा दर मार्च 2022 मध्ये 21.5 टक्क्यांवर गेला आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंकेचे अर्थमंत्री अली साबरी यांनी वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदत पॅकेज मागितले होते. त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला. पुढील चार महिन्यांत औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी श्रीलंकेला जागतिक बँकेकडून (World Bank) 300 दशलक्ष ते 600 दशलक्ष डॉलर्स मिळणार असल्याचे दिलासादायक वृत्त आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत पॅकेज साठी बोलणी सुरू आहेत.

राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर फेब्रुवारी 2022 मध्ये 17.5 टक्क्यांवरून मार्च 2022 मध्ये 21.5 टक्क्यांवर गेल्याचे जनगणना व सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. यासह अन्नधान्य चलनवाढीचा दर फेब्रुवारी 2022 मधील 24.7 टक्क्यांवरून मार्चमध्ये 29.5 टक्क्यांवर गेला. या काळात तांदूळ, साखर, दूध, ब्रेड अशा खाद्यपदार्थांचे दर वाढले.

परकीय चलनाचा तीव्र तुटवडा

श्रीलंकेतील आर्थिक संकटाचे एक प्रमुख कारण म्हणजे परकीय चलनाची कमतरता हे आहे. यामुळे देश जीवनावश्यक वस्तू आणि इंधनांच्या आयातीसाठी पैसे देण्याच्या स्थितीत नाही. ज्यामुळे वस्तूंच्या तुटवड्यासह त्याच्या किंमती वाढत आहेत. देशावर एकूण 25 अब्ज डॉलरचे परकीय कर्ज आहे. त्यात कर्जापोटी यंदाच्या परतफेडीचे 7 अब्ज डॉलरचा समावेश आहे.

या मदतीबाबत अर्थमंत्री अली साबरी म्हणाले की, आयएमएफशी चर्चा करण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो आणि दरम्यान, जागतिक बँक मदत देण्यास तयार आहे. लंकेचा सर्वात शेजारच्या भारतानेही इंधन खरेदी करण्यासाठी 50 कोटी डॉलर देण्याचे मान्य केले असून नवी दिल्लीकडून एक अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे साबरी यांनी सांगितले. भारताने श्रीलंकेला यापूर्वीच 1 अब्ज डॉलरची कर्ज मदत दिली आहे.

100 रुपयात मिळतोय एक कप चहा

श्रीलंकेत एक कप चहाची किंमत 100 रुपये, ब्रेड 1400 रुपये प्रति पॅकेट, तांदूळ 500 रुपये किलो आणि एलपीजी सिलिंडर 6500 रुपये दराने मिळत आहे. एवढी महागाई असूनही श्रीलंकेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला 500 रुपये मिळू शकत नाहीत. पैशाअभावी सरकारने अनेक देशांतील आपले दूतावास बंद केले असून परकीय चलनाचा साठाही संपला आहे. श्रीलंकेकडे केवळ 2 अब्ज डॉलर्सचा परकीय साठा शिल्लक आहे, त्याआधारे केवळ एक महिन्याची आयात करु शकता येईल.

भारताने 11 हजार टन तांदूळ पाठवला

श्रीलंकेची अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. येथे अन्न व इंधनाचे मोठे संकट ओढावले आहे. या संकटात भारत सतत मदत करत आहे. पारंपरिक नववर्षापूर्वी भारताने श्रीलंकेला 11 हजार टन तांदूळ पाठवला होता. श्रीलंकेचे लोक 13 आणि 14 एप्रिल रोजी सिंहला आणि तमिळ नवीन वर्ष साजरे करतात.

संबंधित बातम्या

bomb attack in Afghan : अफगानिस्तानातील बॉम्ब स्फोटांची मालिका थांबेना; आता झाला कुंदूजमधील एका मशीदीत बॉम्ब स्फोट, 30 जणांचा मृत्यू

Mike Tyson ची सटकली! भर विमानात प्रवाशाच्या तोंडावर एकामागोमाग एक दे दणादण मुक्के, व्हिडीओ व्हायरल

Juma Masijid | कर्नाटकातील मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान सापडली हिंदू मंदिरासारखी रचना