
थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा एकदा सीमेवर तणाव वाढला आहे. थायलंडने कंबोडियाच्या सैन्य तळांवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. याआधी दोन्ही देशांच्या सैनिकांनी गुरुवारी सकाळी सीमेवर एकमेकांवर फायरिंग केली होती. थाई सैनिकांनी आधी गोळीबार केल्याचा आरोप कंबोडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. तर कंबोडियाने सैन्य पाठवण्यापूर्वी एक ड्रोन तैनात केला होता. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. गोळीबाराचं कारणही मोठं अचंबित करणारं आहे.
दोन्ही देशात संघर्ष सुरू होण्यामागचं कारण जुनं आहे. या ठिकाणी 1100 वर्षापूर्वीचं एक शिव मंदिर याला कारणीभूत ठरलं आहे. या शिव मंदिराला प्रेह विहेयर म्हटलं जातं. या मंदिराला 9 व्या शतकात खमेर स्रमाट सूर्यवर्मन याांनी बांधलं होतं. पण आता हे शिव मंदिर केवळ आस्थेचं केंद्र राहिलं नाही तर राष्ट्रवादी, राजकारण आणि सैन्य बळाचा आखाडा बनलं आहे.
पंतप्रधानांची खुर्ची गेली
2 जुलै 2025 रोजी थायलंडचे पंतप्रधान पैतोंगतर्न शिनावात्रांना कोर्टाने निलंबित केलं होतं. एक फोन कॉल यामागे कारण होतं. कंबोडियातील एका वरिष्ठ नेत्याला शिनावात्रा काका म्हणून संबोधित करतानाचा हा फोन कॉल होता. सीमेवरील वातावरण तणावपूर्ण असताना हा फोन कॉल व्हायरल झाला. ही बातचीत राष्ट्रीय गौरवाच्या विरोधात मानली गेली. त्यानंतर राजकीय आखाडा रंगला आणि त्यात पंतप्रधान शिनावात्रा यांना आपली खुर्ची गमवावी लागली.
दावा काय ?
मंदिर आपल्या सीमेत असल्याचा कंबोडियाचा दावा आहे. तर मंदिराचा काही भाग सुरिन प्रांतात असल्याचा दावा थायलंडने केला आहे. हे मंदिर डांगरेक डोंगरात आहे. इथूनच ऐतिहासिक खमेर राजमार्ग जातो. हा मार्ग अंगकोर (कंबोडिया) आणि फिमाई (थायलंड)ला जोडतो. गेल्या अनेक दशकांपासूनचा हा मंदिराचा वाद आहे. उलट काळानुसार हा वाद अधिकच चिघळत गेला. आता तो दोन्ही देशाच्या राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा झाला आहे.
मूळ कुठे आहे ?
हा वाद 20 व्या शतकापासून सुरू झाला. 1904मध्ये असे ठरले होते की, नैसर्गिक जल विभाजनाच्या आधारे सीमा ठरवल्या जातील. परंतु 1907मध्ये जो नकाशा तयार करण्यात आला, त्यात मंदिर कंबोडियात दाखवण्यात आलं. त्यामुळे त्याला कंबोडियाने विरोध केला. त्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलं. पण न्यायालयाने हा विरोध फेटाळून लावला.
1962मध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टाने कंबोडियाला मंदिराचा अधिकार दिला होता. पण थायलंडने हा निर्णय पूर्णपणे मान्य केला नाही. तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या जागेवर थायलंडने दावा केला आहे. 2008मध्ये युनेस्कोने या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील केलं. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव वाढत आहे. 2008 ते 2011 मंदिराच्या आजूबाजूच्या भूखंडावरून दोन्ही देशात संघर्ष झाले. 2011 मध्ये एक आठवडाभर दोन्ही देशात गोळीबार झाला. त्यात 42 नागरिक मारले गेले. त्यात सैनिकांचाही समावेश होता. यात कंबोडियातील 19 सैनिक आणि 3 सामान्य नागरिक होते. तर थायलंडचे6 सैनिक आणि 4 नागरिक मारले गेले आहेत.