
काही दिवसांपूर्वी युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद हे अचानक तीन तासांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अनेक करार झाले आहेत, ज्यामुळे दक्षिण आशियातील देशांवर मोठा परिणाम झाला आहे. भारत सोडल्यानंतर शेख मोहम्मद बिन झायेद यांनी 900 भारतीयांना तुरुंगातून सोडून आपली मैत्री दाखवली. त्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानला सर्वात मोठा दणका दिला आहे. युएईने पाकिस्तानच्या इस्लामाबाद विमानतळाचे संचालन करण्याचा करार रद्द केला आहे. काहीच महिन्यांपूर्वी झालेला हा करार आता रद्द करण्यात आल्याने पाकिस्तानची झोप उडाली आहे.
पाकिस्तान गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात आहे. ऑगस्ट 2025 मध्ये युएईने इस्लामाबाद विमानतळाचे व्यवस्थापन करण्यासाठी सहमती दर्शविली होती. मात्र आता युएईने या करारातून माघार घेतली आहे. इस्लामाबाद विमानतळाबाबतचा करार मोडण्यामागे कोणती राजकीय कारणे आहेत याबाबत अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा युएई आणि सौदी अरेबियामधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने युएईचा प्रतिस्पर्धी असलेल्या सौदी अरेबियाशी संरक्षण करार केला. त्यामुळे कदाचित युएईने हा करार मोडला असल्याचे समोर आले आहे.
युएई आणि भारत यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहचत असताना ही बातमी आली आहे. 19 जानेवारी रोजी शेख मोहम्मद बिन झायेद अचानक दिल्लीत आले होते. ते फक्त 3 तास दिल्लीत होते. मात्र आता या भेटीचे परिणाम दूरगामी होणार असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे दोन्ही आखाती देशांशी दीर्घकालीन आणि आर्थिक संबंध आहेत, मात्र पाकिस्ताना नेहमीच सौदी अरेबियाकडे अधिक झुकलेला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला. त्यामुळेच युएईने पाकिस्तानपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान आणि युएई यांनी विमान वाहतूक क्षेत्रात एकमेकांना मदत केलेली आहे. 1980 च्या दशकात एमिरेट्स एअरलाइन्सच्या स्थापनेत पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानने तांत्रिक मदतीपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व काही पुरवले होते. एमिरेट्सची पहिली फ्लाईट दुबई ते कराची होती. मात्र काही काळानंतर पाकिस्तानच्या सरकारी मालकीच्या एअरलाइनची स्थिती बिघडली. त्यामुळे युएईने इस्लामाबाद विमानतळाचे संचालन करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता हा करार मोडला आहे.