War : रशिया-चीन की इराण… व्हेनेझुएलाला वाचवण्यासाठी अमेरिकेशी कोण भिडणार? या देशाने घेतला मोठा निर्णय
US Attack on Venezuela : अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात एक आक्रमक पाऊल उचलले असून राजधानी कराकसवर हल्ले केले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. आता व्हेनेझुएलाच्या मदतीला कोण धावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी बातमी आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात एक आक्रमक पाऊल उचलले असून राजधानी कराकसवर हल्ले केले आहेत. गेल्या काही काळापासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशाप्रकारच्या हल्ल्याचे इशारे दिले होते. मात्र आता अमेरिकेने थेट हल्ला केला आहे, त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. आज सकाळी कराकसमध्ये सात शक्तिशाली स्फोट झाले. कराकसच्या दक्षिण भागात एक प्रमुख लष्करी तळ आहे, या परिसराची वीज खंडित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळे व्हेनेझुएलामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता अमेरिकेपासून व्हेनेझुएलाला वाचवण्यासाठी कोणता देश पुढाकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यात पुढील काही देशांचा समावेश आहे.
रशिया मदत करणार?
रशिया आणि व्हेनेझुएलाचे संबंध मजबूत आहेत. याआधी रशियाने व्हेनेझुएलाला आर्थिक, राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा दिलेला आहे. रशियाने अनेकदा लष्करी दिलेली आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर व्हेनेझुएलाची बाजू घेतलेली आहे. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. रशिया सध्या युक्रेनसोबतच्या युद्धात अडकला आहे. त्यामुळे आता संकटाच्या काळात रशिया व्हेनेझुएलाला लष्करी मदत करण्याची शक्यता नाही. मादुरो सरकारने ऑक्टोबरमध्ये मदतीची विनंती केली होती, मात्र रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
चीन काय भूमिका घेणार?
चीन हा अमेरिकेचा विरोधक देश आहे, मात्र चीन या युद्धात थेट सहभाग घेण्याची शक्यता नाही. व्हेनेझुएला मध्ये तेल साठे आहेत, याची चीनला गरज देखील आहे, मात्र ते अमेरिकेशी थेट भिडण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, जर आगामी काळात युद्ध आणखी पेटले तर चीन संयुक्त राष्ट्र आणि जागतिक व्यासपीठांवर व्हेनेझुएलाचा मुद्दा नक्कीच उपस्थित करेल, मात्र लष्करी मदत पुरविण्याची शक्यता कमी आहे.
कोलंबियाचा उघडपणे व्हेनेझुएलाला पाठिंबा
अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर कोलंबियाने उघडपणे व्हेनेझुएलाला समर्थन दिले आहे. कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका क्षेपणास्त्र हल्ले करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे कोलंबियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. कोलंबिया हा UNSC चा तात्पुरता सदस्य आहे, त्यामुळे कोलंबियाने आवाज उठवल्यास जागतिक स्तरावर त्याची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
इराण आणि क्युबा काय निर्णय घेणार?
इराण आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध चांगले आहेत. मात्र सध्या इराण स्वतः सध्या गंभीर संकटात आहे. इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत, महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त आहे. तसेच या देशात सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराणकडूनही मदत होण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरीकडे क्युबा व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मादुरो सरकारच्या गुप्तचर आणि लष्करी यंत्रणेवर क्युबाचा प्रभाव आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे क्युबा या मोठ्या युद्धात उतरण्याची शक्यता कमी आहे.
