US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा! फोटोने खळबळ, नेमकं काय घडलं?

US Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही पोस्ट पाहून इराणने दिलेल्या प्रत्युत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा! फोटोने खळबळ, नेमकं काय घडलं?
Donald Trump Post
Image Credit source: Social Media
| Updated on: May 24, 2026 | 10:06 AM

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी चिघळत चालला आहे. तो थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. दोन्ही देशांमधील कराराच्या चर्चा अद्याप निष्फळ ठरल्या आहेत. या वाढत्या तणावाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अशातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका सूचक सोशल मीडिया पोस्टमुळे अमेरिका इराणवर मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट आणि हल्ल्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्याने जगभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फोटोमध्ये इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दाखवण्यात आला असून, त्यावर ‘युनायटेड स्टेट्स ऑफ मिडल ईस्ट’ असे लिहिले आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी या पोस्टसोबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा भाष्य केलेले नाही. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, जर करारावर लवकर तोडगा निघाला नाही, तर ट्रम्प इराणवर थेट हल्ला करण्याच्या पर्यायावर अत्यंत गांभीर्याने विचार करत आहेत.

तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी

या दोन्ही देशांमधील वाढता तणाव कमी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सध्या इराणच्या दौऱ्यावर आहेत. इराणच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनीर यांनी या दौऱ्यात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गालिबफ यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेऊन चर्चा केली आहे.

इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला आणि इशारा

एकीकडे अमेरिका हल्ल्याचे संकेत देत असताना, दुसरीकडे इराणनेही अमेरिकेवर जोरदार शाब्दिक पलटवार केला आहे. फिनलँडमधील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’ (X) या समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांना कधी वाटते की व्हेनेझुएला हे अमेरिकेचे ५१ वे राज्य आहे, तर कधी ते ग्रीनलँडला ५२ वे राज्य मानतात,” असा टोला इराणने लगावला आहे. शिवाय, अमेरिकेने असे ‘हवेत पुल’ बांधण्याची स्वप्ने पाहू नयेत, अन्यथा या विस्ताराच्या प्रयत्नात अमेरिका स्वतःच्या हातातील ५० राज्येही गमावून बसेल, असा थेट इशारा इराणकडून देण्यात आला आहे.

Follow Us