चीन, अमेरिका नव्हे, या 3 देशांच्या पंतप्रधानांना मिळतो सर्वाधिक पगार, PM मोदी कितव्या क्रमांकावर?

Highest Paid World Leaders : आज आपण जगातील सर्वाधिक वेतन घेणारे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी कितव्या क्रमांकावर आहेत ते जाणून घेऊयात.

चीन, अमेरिका नव्हे, या 3 देशांच्या पंतप्रधानांना मिळतो सर्वाधिक पगार, PM मोदी कितव्या क्रमांकावर?
world highest paid prime ministers
Image Credit source: Google
| Updated on: Sep 09, 2026 | 8:09 PM

जगातील अनेक देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असं असतानाच एका देशाने आपल्या पंतप्रधानांच्या पगारात 60 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देश म्हणजे सिंगापूर आणि तेथील पंतप्रधान आहेत लॉरेन्स वोंग. सिंगापूर सरकारने पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सदस्य आणि इतर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर, म्हणजेच जवळपास 27.09 कोटी रुपये होणार आहे.

सिंगापूरमध्ये या निर्णयावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सरकारच्या मते, देशासाठी सक्षम आणि प्रतिभावान व्यक्तींना राजकारणात आणण्यासाठी ही वेतनवाढ आवश्यक आहे. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना सरकारचा हा निर्णय असंवेदनशील असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. आज आपण जगातील सर्वाधिक वेतन घेणारे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी कितव्या क्रमांकावर आहेत ते जाणून घेऊयात.

लॉरेन्स वोंग पहिल्या क्रमांकावर

सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या यादीत सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग पहिल्या क्रमांकावर आहेत. सध्या त्यांचे वार्षिक पॅकेज सुमारे 2.2 दशलक्ष सिंगापूर डॉलर होते. आता ते वाढवून 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर करण्यात आले आहे. म्हणजेच वोंग यांचे उत्पन्न अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या 4 लाख डॉलरच्या वार्षिक वेतनाच्या तुलनेत जवळपास सात पट आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, उच्च वेतनाचा उद्देश खासगी क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींना राजकारणाकडे आकर्षित करणे आणि भ्रष्टाचाराचा धोका कमी करणे हा आहे.

हाँगकाँगचे जॉन ली दुसऱ्या क्रमांकावर

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी जॉन ली आहेत. रिपोर्टनुसार, त्यांचे वार्षिक पॅकेज सुमारे 7.19 लाख अमेरिकी डॉलर आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 6.06 लाख अमेरिकी डॉलर आहे. स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्राध्यक्षपद रोटेशनच्या आधारावर दिले जाते आणि फेडरल कौन्सिलचे सदस्यही महत्त्वाची कार्यकारी भूमिका बजावतात.

सिंगापूरच्या पंतप्रधानांचा पगार अधिक

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या प्रस्तावित नवीन वेतनाची तुलना जगातील इतर मोठ्या देशांच्या राष्ट्राध्यक्ष आणि सरकारप्रमुखांशी केली, तर मोठा फरक दिसून येतो. वेतनवाढीपूर्वीदेखील सिंगापूरच्या पंतप्रधानांना अमेरिका आणि अनेक देशांच्या नेत्यांच्या तुलनेत मोठे वार्षिक वेतन मिळत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वार्षिक सुमारे 4 लाख डॉलर, म्हणजे जवळपास 3.4 कोटी रुपये वेतन मिळते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वार्षिक वेतन उपलब्ध माहितीनुसार सुमारे 1.4 लाख अमेरिकन डॉलर, म्हणजे जवळपास 1.16 कोटी रुपये आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे वार्षिक वेतन सुमारे 1.5 लाख युआन*, म्हणजे जवळपास 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

नरेंद्र मोदी या यादीत कुठे आहेत?

वेगवेगळ्या अहवालांनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक वेतन सुमारे 19.2 लाख ते 24 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, पंतप्रधानांना मिळणारे लाभ केवळ वेतनापुरते मर्यादित नसतात. त्यांना अधिकृत निवासस्थान, प्रवास, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा तसेच विविध प्रकारचे भत्ते आणि सरकारी सुविधा मिळतात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us