
अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेकांच्या मनात विमान प्रवासाची भीती निर्माण झाली आहे. फक्त अहमदाबाद विमान अपघातच नाही तर अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे आता विमान सेवा सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एकदा का विमानाने टेकऑफ केलं की पुढे काय होईल, प्रवास नीट होईल ना किंवा विमान हवेत असताना काही अपघात तर होणार नाही नाही असे अनेक प्रश्न पडतात. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, समजा विमान हवेत असताना जर एक्झीट गेट उघडलं तर काय होईल? मुख्य म्हणजे विमान हवेत असताना हे एक्झिट गेट असं उघडू शकतो का? अन् असा कोणी प्रयत्न केलाच तर ते किती धोकादायक असू शकतं हे जाणून घेऊयात.
विमान उड्डाण करताना Exit गेट उघडू शकतो की नाही?
उडणाऱ्या विमानाचे म्हणजे हवेत असणाऱ्या विमानाचे गेट सामान्यपणे उघडता येत नाही कारण विमानाच्या आतील दाब बाहेरील दाबापेक्षा खूप जास्त असतो, ज्यामुळे दरवाजा उघडणे अशक्यच असते. तथापि, असे दिसून आले आहे की काही लोकांनी उडणाऱ्या विमानाचे गेट उघडण्याचा प्रयत्न केलाही, जो कि तेव्हा धोकादायकही ठरला असता. पण वेळीच तो अनर्थ टळला.
जर Exit गेट उघडले तर काय होईल?
जर हा दरवाजा उघडला तर विमानातील दाब लगेच बदलेल आणि विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी एअरलाइन्सने कडक नियम बनवले आहेत. जर कोणत्याही प्रवाशाने चुकूनही विमानाचे Exit गेट उघडण्याचा प्रयत्न केला तर एअरलाइन त्या व्यक्तीला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकू शकते.
गेट का उघडू नये?
हवेत असताना विमानाचे गेट अजिबात उघडू नये. किंवा तसा प्रयत्नही करू नये. याची कारणे म्हणजे,
सुरक्षिततेचा धोका: उडणाऱ्या विमानाचे गेट उघडल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यामुळे हवेचा दाब आणि तापमानात अचानक बदल होऊ शकतात, ज्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत होऊ शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.
विमानाची रचना: विमानाचे Exit गेट विशेषतः उड्डाणादरम्यान सुरक्षितपणे बंदच राहिल अशापद्धतीनेच डिझाइन केलेले असते. गेट उघडल्याने विमानाची रचना आणि सुरक्षा व्यवस्था खराब होऊ शकते.
एअरलॉक असते: दरम्यान जेव्हा विमान हवेत असते तेव्हा आपत्कालीन एक्झिट उघडणे पूर्णपणे अशक्य असते कारण ते एअरलॉक असते. पण जर कोणी आपत्कालीन हॅच उघडण्यात यशस्वी झाले तरी, उड्डाणात डीकंप्रेशनची परिस्थिती निर्माण होईल आणि सर्व ऑक्सिजन मास्क उघडतील. त्यानंतर पायलटला 4 मिनिटांत उड्डाण 14 हजार फूट उंचीवर घेऊन जावे लागेल.
विमानाची दिशाच बदलू शकते: विमान धावपट्टीवर 92 मैल प्रति तास वेगाने पुढे जाते तेव्हाच लॉक सिस्टीम सक्रिय होते. त्यामुळे, विमानाचा वेग कमी होईपर्यंत ते उघडणे अशक्य आहे. जरी एक्झिट गेट विमान हवेत असताना उघडणे अशक्य असले तरी. इमर्जन्सी स्कॅप हॅच जर उघडला तर मात्र विमानाची दिशाच बदलू शकते आणि ते अनियंत्रीत होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय नियम: उड्डाणादरम्यान विमानाचा मेन एक्झिट गेट किंवा इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे एअरलाइन तुम्हाला नो-फ्लाय झोन श्रेणीत टाकू शकते आणि त्याहूनही गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे उडणाऱ्या विमानाचे गेट उघडण्याचा प्रयत्न करू नये. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विमानाचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
बऱ्याचदा, काही लोक विमाना हवेत असताना इमर्जन्सी एक्झिट गेट (आपत्कालीन गेट) उघडण्याचा प्रयत्न करतात. असे फक्त तेच लोक करतात जे 30 हजार फूट उंचीवर विमानात त्रास निर्माण करू इच्छितात. 2023 मध्ये, दक्षिण कोरियातील डेगू येथे विमान उतरण्यापूर्वी आशियाना एअरलाइन्सच्या एका प्रवाशाने एक्झिट गेट उघडले होते. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती, मात्र विमान सुरक्षितपणे उतरले.म्हणून अनर्थ टळला.