
निवडणुका, मतदान आणि मतदार याद्या वरून गेल्या काही दिवसांपासून रणकंदन माजलं आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. इतकंच काय तर निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत तर दोन वोटर आयडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे दोन वोटर आयडी सापडले आहेत. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. दरम्यान दोन वोटर आयडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतात दोन वोटर आयडी कार्ड ठेवणाऱ्यांची संख्या सांगणं तसं कठीण आहे. पण निवडणूक आयोग, एडीआर आणि मिडिया रिपोर्टनुसार ही संख्या लाखाच्या घरात असू शकते. निवडणूक आयोगाने सांगितलं की, 1.2 कोटी लोकांची नाव डुप्लिकेट, मृत किंवा चुकीच्या पत्त्यावर आढळली आहे. यापैकी काही जणांकडे दोन वोटर आयडी कार्ड होते.
तुमच्याकडे दोन वोटर आयडी असतील तर फॉर्म 7 भरून एक कार्ड जमा करा. स्थानिक बूथ लेव्हल अधिकारी किंवा बीएलओशी संपर्क साधून दुरुस्त करून घ्या. असं करण्यासाठी कोणतीही कारवाई केली जात नाही. डुप्लिकेट किंवा जुने मतदार कार्ड रद्द करा. जुन्या कार्डसंदर्भात तपशील निवडणूक कार्यालयात जमा करा. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकता.