Palangtod Mithai: कधी खाल्ली का पलंगतोड मिठाई? खरेदीसाठी दुकानावर लांबच लांब लाईन
Palangtod Mithai: तुम्ही पलंगतोड पान नक्की ऐकलं असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे पान हमखास मिळते. पण पलंगतोड मिठाई तुम्ही कधी ऐकली अथवा खाल्ली आहे का? कोणत्या शहरात मिळते ही खास मिठाई? जाणून घ्या माहिती.

भारत हा खवय्यांचा देश आहे. विविध खाद्यसंस्कृतीने भारत समृद्ध आहे. लाजबाब डिशेस आणि रुचकर जेवणाचा, तृप्तीचा ढेकर देण्याचा आनंद तुम्ही भारतातच घेऊ शकता. इथे प्रत्येक प्रांताचीच नाही तर प्रत्येक शहरात काही ना काही हटके खाद्य पदार्थ मिळतो. तुम्ही पलंगतोड पान नक्की ऐकलं असेल. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकाजवळ हे पान मिळते. ते जगप्रसिद्ध आहे. त्याची किंमतही तशीच जबरी आहे बरं का? पण तुम्ही कधी पलंगतोड मिठाई खाल्ली अथवा ऐकली आहे का? कुठे मिळते ही खास मिठाई?
का म्हणतात पलंगतोड मिठाई?
तर पलंगतोड मिठाई हा शब्द ऐकताना वेगळाच फिल येतो. तर नावाप्रमाणेच ही मिठाई खाल्यानंतर ऊर्जा मिळते. ताकद वाढल्यासारखे वाटते असा दावा केला जातो. या मिठाईमध्ये मलईचे 20 वेगवेगळे थर असतात. त्यात वेलची, केशर, खजूर, गूळ आणि सुकामेवा कुटून टाकलेला असतो. ही मिठाई जिभेवर ठेवताच एकदम खास स्वाद मिळतो. ती लागलीच विरघळते. मलाईचे 20 थर आणि त्यावर सुकामेवा यामुळे मन तृप्त होते.
ही मिठाई शुद्ध दूध, मावा, भरपूर प्रमाणात असलेले काजू, बदाम, पिस्ता आणि काही आयुर्वेदिक औषधी घटक, जडीबुटींचा वापर करून तयार करण्यात येते. ही मिठाई खाल्ल्यानंतर शरीराला मोठी ऊर्जा मिळते. ताकद आणि स्फूर्ती मिळते, असा दावा करण्यात येतो. त्यामुळेच या मिठाईला पलंगतोड असे अजब आणि मजेशीर नाव देण्यात आले आहे.
खवय्यांच्या लांबच लांब रांगा
ही मिठाई खाण्यासाठी खवय्यांच्या लांबच लांब रांगा दिसतात. हिवाळ्यात तर या मिठाईची मागणी इतर सर्व ऋतूंपेक्षा सर्वाधिक असते. आठवड्याच्या अखेरीस, महिन्यातून एकदा या मिठाईची मागणी असते. अनेक जण ती घरी घेऊन जातात. अनेक पर्यटक या शहरात आल्यावर ही मिठाई आवर्जून खातात. अर्थात ही मिठाई काही स्वस्त नाही. ती महाग मिळते. पण अनेक जण ती खाल्ल्याशिवाय राहत नाही.
कोणत्या शहरात मिळते ही मिठाई
तर उत्तर प्रदेशातील धार्मिक शहर वाराणसी, बनारस हे आहे. तर याशिवाय कालपी हे शहर सुद्धा या मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात या मिठाईला केवळ पलंगतोड म्हणत नाही. काही जण त्याला बिस्तर बंद, बेड रोल या नावानेही ओळखतात. ही मिठाई खाण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेकजण येतात. फूड ब्लॉगरमुळे ही मिठाई आता देश-परदेशात प्रसिद्ध ठरली आहे.