पाकिस्तानमध्ये नागरी युद्धाची स्थिती, सैन्य आणि पोलीस आमने-सामने, कराचीत तिरंगाही फडकावला?

| Updated on: Oct 21, 2020 | 5:20 PM

पाकिस्तानमध्ये मोठं राजकीय संकट तयार झालं असून नागरी युद्धाची स्थिती तयार झालीय

पाकिस्तानमध्ये नागरी युद्धाची स्थिती, सैन्य आणि पोलीस आमने-सामने, कराचीत तिरंगाही फडकावला?
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सध्या जोरदार विरोध होत आहे. पाकिस्तानच्या 9 विरोधी पक्षांनी पाकिस्तान डेमॉक्रेटिक मुव्हमेंट (PDM – Pakistan Democratic Movement) ही आघाडी उघडून जोरदार आंदोलनं सुरु केली आहेत. विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्यावर सैन्याच्या मदतीने सत्तेत पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याविरोधात तेथील पोलीस देखील समोर आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठं राजकीय संकट तयार झालं असून नागरी युद्धाची स्थिती तयार झालीय (Anarchy situation in Pakistan Army and police fighting in Pakistan ).

पाकिस्तानमधील या राजकीय संकटाच्या काळातच सध्या ट्विटरवर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाकिस्तानमधील कराचीतील आंदोलनाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या फोटोतील प्रचंड गर्दीत आंदोलनकर्ते भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या आंदोलनानंतर पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांचे पती सफदर एवान यांनाही अटक करण्यात आले होते. या रॅलीत मरियम यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली होती. नवाज शरीफ देखील या रॅलीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

सिंधच्या पोलीस महासंचालकांचं अपहरण?

दरम्यान पाकिस्तानमधील सिंध प्रांताच्या पोलीस प्रमुखांना पाकिस्तान सैन्याने अटक केल्याचीही माहिती समोर आली आहे. सिंधच्या पोलीस प्रमुखांचं अपहरण करुन त्यांना जबरदस्तीने पीएमएल नेता मरियम नवाजच्या पतीच्या अटकेच्या आदेशावर सही करण्यास सांगण्यात आल्याचाही आरोप होत आहे. पाकिस्तान सैन्याचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलीस प्रमुखांच्या अटकेच्या निषेधार्थ पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

सिंध पोलीस प्रमुखांना अटक केल्याच्या विरोधात येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे सुट्टीवर जात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 3 अतिरिक्त आयजी, 25 डीआयजी, 30 एसएसपी आणि सिंधचे अनेक एसपी, डीएसपी आणि एसएचओसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सैन्याच्या या कारवाईविरोधात सुट्टीचा अर्ज करत याला विरोध केलाय. तसेच परिस्थितीत सुधारण न झाल्यास राजीनाम्याचाही इशारा दिलाय.

सैन्य आणि पोलिसांच्या संघर्षात 10 जणांचा मृत्यू़

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, मंगळवारी (20 ऑक्टोबर) पोलीस आणि सैन्य समोरासमोर आलं. यात जवळपास 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तान सैन्याकडून गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. या विरोधात विरोधी पक्ष येत्या रविवारी ( 25 ऑक्टोबर) मोठं आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा :

इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाला अटक

पाकिस्तान PoK मधून आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत विरोध कायम : सज्जाद राजा

Jannat Mirza | ‘पाकिस्तानी लोकांची मानसिकता खराब’ म्हणत, ‘टिकटॉक’ स्टारचा पाकिस्तानला ‘अलविदा’!

Anarchy situation in Pakistan Army and police fighting in Pakistan