मॉब लिंचिंगची खोटी तक्रार दिल्यास तक्रारदारांवरही कारवाई करणार : पोलीस आयुक्त

| Updated on: Jul 23, 2019 | 1:10 PM

मॉब लिंचिंगची वाढवून-चढवून खोटी तक्रार दिली तर त्या तक्रारदारांवरही कारवाई करणार असल्याचे मत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

मॉब लिंचिंगची खोटी तक्रार दिल्यास तक्रारदारांवरही कारवाई करणार : पोलीस आयुक्त
Follow us on

औरंगाबाद : मागील काही दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये 2 मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी (22 जुलै) एका झोमॅटो कामगाराला ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करत मारहाण केल्याची घटना घडली. यावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मॉब लिंचिंगची वाढवून-चढवून खोटी तक्रार दिली तर त्या तक्रारदारांवरही कारवाई करणार असल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त प्रसाद म्हणाले, “मागील काळी दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये मॉब लिंचिंगच्या 2 घटना घडल्या. त्यातील एका घटनेचा व्हिडीओ आम्हाला मिळाला आहे. त्या व्हिडीओचा तपास सुरु आहे. त्यात जर तक्रारदारांनी तक्रार वाढवून सांगितल्याचे आढळले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.”

दरम्यान, देशभरात धार्मिक उन्मादाचे वातावरण वाढत असताना राज्यातही अशाच काही घटना घडलेल्या आहेत. औरंगाबादमधील आझाद चौकात सोमवारी रात्री झोमॅटोत काम करणाऱ्या मुस्लीम कामगाराला ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करत मारहाण केल्याचा आरोप झाला होता. पीडित व्यक्तीवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचंही सांगण्यात आलं होतं. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली होती.

या घटनेमुळे सोमवारी औरंगाबादमधील आझाद चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी जमा झालेल्या जमावाने आरोपींवर गुन्हे दाखल करुन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला आणि तणाव निवळला. सिडको पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.