राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपचं ‘उपोषणास्त्र’; शिर्डी, सोलापूर, सांगली, कोल्हापुरात भाजपचे आंदोलन

| Updated on: Oct 13, 2020 | 12:23 PM

व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी साईबाबांचं मंदिर सुरु करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपचं उपोषणास्त्र; शिर्डी, सोलापूर, सांगली, कोल्हापुरात भाजपचे आंदोलन
Follow us on

मुंबई : राज्यात बार, हॉटेल्स सुरु झाली. पण मंदिरे अद्यापही बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आज शिर्डीमध्ये साईबाबांचं मंदिर उघडण्यासाठी भाजपने आंदोलन केले आहे. भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ निदर्शने केली. (BJP Agitation for Temple Reopen all over Maharashtra)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिर्डीतील साईबाबांचे मंदिर 17 मार्चपासून बंद आहे. गेल्या सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीतील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल शिर्डीमध्ये होत असते. साईंच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येत असतात. त्यामुळे इथले हॉटेल्स, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्यानं इथले व्यापारी आणि व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी साईबाबांचं मंदिर सुरु करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

सोलापूरमध्येही भाजप मंदिरांसाठी आक्रमक

सोलापूरमध्येही मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. बळीवेस इथल्या मल्लिकार्जुन मंदिराबाहेर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात उपोषणाला सुरुवात करण्यात आली. राज्यात बार नको, मंदिरे उघडा अशी मागणी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ठाकरे सरकारकडे केली.

सांगलीत मंदिरांसाठी भाजपचा घंटानाद

सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरासमोर भाजपने आरती करत घंटानादही केला. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने तातडीनं मंदिरांबाबतचा निर्णय घेतला नाही, तर मंदिरात घुसण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला.

कोल्हापूरमध्ये भाजपकडून उपोषणाला सुरुवात

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून कोल्हापुरात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. मिरजकर तिकटीमधील शेष नारायणी मंदिराबाहेर भाजप पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

संबंधित बातम्या :

मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा मंत्र!

(BJP Agitation for Temple Reopen all over Maharashtra)