बुलडाण्यात एकाच कुटुंबातील 5 मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

एकाच कुटुंबातील 5 मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथं ही धक्कादायक घटना घडली.

बुलडाण्यात एकाच कुटुंबातील 5 मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
| Updated on: Sep 23, 2019 | 11:00 AM

बुलडाणा : एकाच कुटुंबातील 5 मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथं ही धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये आईसह चार मुलींचा समावेश आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरु आहे. मात्र चार स्त्रियांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच चर्चा सुरु आहे.

मृतांमध्ये आई उज्वला ढोके, वय – 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष  आणि  पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे.

आज सकाळी हे मृतदेह गावाबाहेरच्या विहिरीत सापडले. काल हे कुटुंब शेतात गेलं होतं. मात्र ते घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती. अखेर आज सकाळी त्यांचे मृतदेह विहिरीत तरंगताना दिसले.

ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. आईसह चार मुलींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागील कारण काय हे शोधणं आता पोलिसांसमोरचं आव्हान आहे. ही आत्महत्या असेल तर त्यामागील कारण काय? याचा शोध घ्यावा लागेल.

दरम्यान, महिलेच्या पतीचे महिनाभरापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे त्या विवंचनेतून या महिलेने आयुष्य संपवलं की काय असा प्रश्न आहे.