दारु सोडा अन्यथा गाव सोडा, बुलडाण्यातील गावाचा निर्णय

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

बुलडाणा:  बुलडाणा जिल्ह्यातील काळेगावच्या ग्रामस्थांनी जबरदस्त निर्णय घेतला. दारु सोडा अन्यथा गाव सोडा या घोषणेअंतर्गत दारुड्याला सरकारी योजनांचा लाभ देणं बंद करण्याचा निर्णय काळेगावने घेतला. इतकंच नाही तर ग्रामस्थांनी बेवड्यांना ग्रामपंचायतीकडून दाखले न देण्याचाही निर्णय घेतला. दारुमुळे गावात दररोज होणारी भांडणे, आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबं हे परिसरातील चित्र. ही समस्या गावात उग्ररुप धारण करत […]

दारु सोडा अन्यथा गाव सोडा, बुलडाण्यातील गावाचा निर्णय
Follow us on

बुलडाणा:  बुलडाणा जिल्ह्यातील काळेगावच्या ग्रामस्थांनी जबरदस्त निर्णय घेतला. दारु सोडा अन्यथा गाव सोडा या घोषणेअंतर्गत दारुड्याला सरकारी योजनांचा लाभ देणं बंद करण्याचा निर्णय काळेगावने घेतला. इतकंच नाही तर ग्रामस्थांनी बेवड्यांना ग्रामपंचायतीकडून दाखले न देण्याचाही निर्णय घेतला.

दारुमुळे गावात दररोज होणारी भांडणे, आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबं हे परिसरातील चित्र. ही समस्या गावात उग्ररुप धारण करत असताना, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली. संपूर्ण  गावकऱ्यांनी त्याला साथ देत पाहता पाहता आख्खं गाव दारुमुक्त केलं. आता या गावात दारु विक्री तर दूर, पण दुसऱ्या गावावरुनही जर दारु पिऊन कोणी आला तर  त्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नाही. याशिवाय कोणत्याही प्रकारचे दाखले ग्रामपंचायतीमधून मिळणार नाहीत.

ही किमया केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काळेगाव इथल्या ग्रामस्थांनी.

देशातील प्रत्येक खेडेगाव हे आदर्श गाव व्हावे यासाठी सरकारी पातळीबरोबरच ग्रामीण पातळीवरही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे आहेत. कारण मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला अनेक खेड्यात दिसून येतो. शाळांची बकाल अवस्था, शिक्षणाबद्धलची अनास्था, वाहतुकीची अपुरी व्यवस्था, तंत्रज्ञानाचा अभाव, या सर्वच उणिवांनी घेरलेल्या गावातील दरडोई उत्पन्नही पोटापुरतेच असते.

बुलडाणा जिल्ह्यातील काळेगाव हे गाव याच पंक्तीत बसणारे.  विकासापासून वंचित असणाऱ्या या गावाचा कायापालट करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आणि आज हेच गाव जिल्ह्यात दारुमुक्त आणि आदर्श गाव म्हणून नावारुपास आले.

या गावाच्या महिला सरपंच माधुरी गायगोळ यांनी गाव दारुमुक्त करण्याची संकल्पना जेव्हा ग्रामस्थांसमोर मांडली, तेव्हा ग्रामस्थांनी गाव संपूर्ण दारूमुक्त करण्याचे ठरवले. त्यावेळी महिलांसहित, तरुणाईनेसुद्धा पुढाकार घेतला आणि सर्वानुमते  गावातील 21 तरुणांचं पथक तयार केले.

गावात दारु पिऊन आलेच तर दारु पिणाऱ्याच्या  घरी हे पथक जाते आणि त्याला समजावून सांगते. त्यानंतर त्याला गावातून बाहेर जाण्यास सांगितलं जातं. जर त्याने ऐकलेच नाही तर त्याला ग्रामपंचायतीकडून मिळणारे सर्व दाखले देणे बंद करत, शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा निर्णयही  ग्रामस्थांनी घेतला आहे.

काळेगाव या गावात दारुची समस्या महत्वाची होती. त्यामुळे गाव दारुमुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनीच कंबर कसली. यासाठी विविध गावातील तरुणांच्या मदतीने दारूमुक्त अभियान राबवण्यात आले. काळेगाव दारूमुक्त झाल्याने गावात होणारे तंटे, भांडणे हे जवळपास नाहीसे झाले आहेत. काळेगावच्या दारुमुक्त निर्णयासह विविध उपक्रमामुळे जिल्ह्यात आज हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.