‘चौकीदार चोर है’बद्दल राहुल गांधींकडून अखेर माफीनामा

'चौकीदार चोर है'बद्दल राहुल गांधींकडून अखेर माफीनामा


नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानेही ‘चौकीदार चोर है’ म्हटलंय, या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर माफी मागितली आहे. राहुल गांधी यांनी या वक्तव्याबद्दल ज्याप्रकारे दिलगिरी व्यक्त केली होती, त्यावरुन सुप्रीम कोर्टाने खंत व्यक्त करत राहुल गांधींना फटकारलंही होतं. “दिलगिरी व्यक्त करण्यासाठी 22 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं का?”

भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी ‘चौकीदार चोर है’ या राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती.

राहुल गांधी यांनी आपल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात कंसात दिलगिरी व्यक्त केली होती. त्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना फटकारताना म्हटलं, “कंसात दिलगिरी व्यक्त करण्याचा अर्थ काय आहे?”

सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने ‘चौकीदार चोर है’ म्हणणं चूक होतं, असं राहुल गांधींची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. तसेच, राहुल गांधींच्या वतीने याप्रकरणी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात ‘माफी’ शब्दाचा उल्लेख करण्यात आला. पुढील सोमवारी राहुल गांधी यांच्याकडून ‘माफी’ शब्दाचा उल्लेख असलेलं प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करणाऱ्या भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांच्याकडून सातत्याने माफीची मागणी केली जात होती. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या बाजूने माफी मागितली गेल्याने आणि येत्या सोमवारी प्रतिज्ञापत्रातून लिखित स्वरुपात माफी मागितली जाणार असल्याने, या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI