‘रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरीबांचे मृत्यू थांबवा’, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि त्यामुळे गरीब रूग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. devendra fadnavis cm uddhav Thackeray corona

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरीबांचे मृत्यू थांबवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
| Edited By: | Updated on: Oct 02, 2020 | 6:08 PM

मुंबई : कोरोनाच्या संकटात राज्यात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलं आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि त्यामुळे गरीब रूग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. यात तातडीनं हस्तक्षेप करत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. (devendra fadnavis letter to cm uddhav Thackeray on corona)

पत्रात देवेंद्र फडणवीसांनी लिहलं की, राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडते. दररोज सरासरी 450 ने मृतांची संख्या वाढतं आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचं औषध असल्यानं त्याचा पुरवठा सुरळीत राहील आणि हे सुनिश्चित करणंदेखील आवश्यक आहे. पण अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्यानं गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करत असलं तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचंच कारण रूग्णांना सांगितलं जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितलं जातं. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचा मृत्यू होण्याचंही प्रमाण वाढलं आहे.

ते पुढे म्हणाले की, रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारनं मध्यंतरी प्रक्रिया राबवली होती. पण ती प्रक्रिया सदोष असल्यानं अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असं वृत्त माध्यमांमध्ये आलं आहे. खरेदी योग्य झाली नसल्यानं याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. यामुळे गरीबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे.

‘एकिकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावा. इतकंच नाही तर सर्व गरीब रुग्णांना सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी पत्राद्वारे केली आहे.

इतर बातम्या – 

मी आणि माझ्या स्टाफने आज लस घेतली, सीरम इन्स्टिट्यूटच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

(devendra fadnavis letter to cm uddhav Thackeray on corona)