आरोप सिद्ध करा, अन्यथा…, एकनाथ खडसेंचा अंजली दमानियांना इशारा

| Updated on: Jan 12, 2020 | 1:36 PM

न्यायालयाने दमानियांना 23 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोप सिद्ध करा, अन्यथा..., एकनाथ खडसेंचा अंजली दमानियांना इशारा
Follow us on

जळगाव : भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी जळगाव न्यायालयाने दमानियांना समन्स जारी केलं आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. “अंजली दमानिया यांनी आरोप सिद्ध करावे, अन्यथा अब्रूनुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे”, असे खडसे म्हणाले आहेत.

“अंजली दमानिया यांनी माझ्यावरती बेछूट आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील 27 न्यायालयांमध्ये अंजली दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहेत. अंजली दमानिया यांनी जे आरोप केले होते ते सिद्ध करून दाखवावे, अन्यथा अब्रूनुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे”, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

न्यायालयाने दमानियांना 23 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. “राजकारणात करण्यासारखं काही न राहिल्याने एकनाथ खडसे यांचा वेळ जात नाही. त्यामुळे ते अनेक मार्गांनी माझा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे दमानिया म्हणाल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात भोसरीत जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली.

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

दरम्यान, मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.

याच प्रकरणी एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांनी निराधार आरोप करत आपली बदनामी केल्याचं म्हणत दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.