EXCLUSIVE गडचिरोली हल्ला : जवानांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो मालकाची धक्कादायक माहिती

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

गडचिरोली : भूसुरुंग स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या आणि QRT चे जवान ज्या गाडीतून प्रवास करीत होते त्या गाडीचे मालक नंदकुमार गहाणे यांनी सर्वप्रथम टीव्ही 9 मराठीवर याबाबतची बाजू मांडली आहे. गहाणे यांचं पशुखाद्याचं दुकान असून दुग्धव्यवसायही आहे. ते शेतीही करतात आणि माल वाहून नेण्यासाठी त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये महिंद्रा बोलेरो ही गाडी घेतली होती. पण उदरनिर्वाहाचं […]

EXCLUSIVE गडचिरोली हल्ला : जवानांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो मालकाची धक्कादायक माहिती
Follow us on

गडचिरोली : भूसुरुंग स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या आणि QRT चे जवान ज्या गाडीतून प्रवास करीत होते त्या गाडीचे मालक नंदकुमार गहाणे यांनी सर्वप्रथम टीव्ही 9 मराठीवर याबाबतची बाजू मांडली आहे. गहाणे यांचं पशुखाद्याचं दुकान असून दुग्धव्यवसायही आहे. ते शेतीही करतात आणि माल वाहून नेण्यासाठी त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये महिंद्रा बोलेरो ही गाडी घेतली होती. पण उदरनिर्वाहाचं साधन असलेली गाडीच उद्ध्वस्त झाल्याने त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. शिवाय चालकालाही शहिदाचा दर्जा द्यावा, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांची गाडी नेल्याचं त्यांनाही माहित नव्हतं.

माझी गाडी पोलीस अधेमधे वापरत असत. त्या दिवशी गाडी वरातीला जायची होती. पण ते भाडं कॅन्सल झालं. गाडी उभी होती. मेजर बगमारे यांनी ड्रायव्हरला फोन केला आणि गाडी बोलावून घेतली. मला पोलिसांनी काहीही कळवलं नाही. परस्पर ड्रायव्हरला फोन केला. ड्रायव्हरने मला सांगितलं. एवढंच… नंतर अर्ध्या तासात मला बातमी कळाली, असं गहाणे म्हणाले.

पोलीस कधीही ड्रायव्हरलाच फोन करीत असत आणि गाडी मागवून घेत असत. गाडी देण्यासाठी ते कधी कधी दबावही आणत असत. भाडंही देत नसत. गाडीत डिझेल टाकत असत, असं गहाणे यांनी म्हटलंय. गाडीतून किती जवान जात होते याची मला कुठलीही कल्पना नव्हती. गाडी पाठीमागे खुली होती. मला स्फोटानंतर घटनास्थळी जाऊ दिले नाही आणि अजूनही पोलिसांनी मला फोन केलेला नाही.

शासनाने माझ्या गाडीचे नुकसान भरून द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. मी चालकाच्या अंत्यविधीला उपस्थित होतो. ड्रायव्हर माझा उजवा हात होता. त्यांच्यावर माझा खूप विश्वास होता. तो चालक आणि मालक दोन्हीही होता. माझी विनंती आहे की त्यालाही 15 शहीद जवानांप्रमाणे शहीद घोषित करण्यात यावे, तसंच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना जितकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे तेवढीच ती चालकाच्या कुटुंबालाही मिळावी. हा चालक माझ्याकडे दसऱ्यापासून होता, असं गहाणे यांनी सांगितलं.

आता नुकसान भरपाईसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर पोलीस बघू असं उत्तर देत आहेत. माझ्याकडे गाडी अचानक मागितली जात असे. आता माझी मानसिकता नाही किंवा इच्छा होत नाही नवी गाडी घेण्याची…. गाडी माझं उदरनिर्वाहाचं साधन होतं, मी आता रस्त्यावर आलोय…कर्जबाजारी झालोय, असंही गहाणे म्हणाले.