
मनोरंजन इंडस्ट्रीतील गटबाजी हा असा एक विषय आहे, ज्यावर कलाकार सहसा मोकळेपणे व्यक्त होत नाहीत. बॉलिवूड असो वा मराठी, इंडस्ट्रीतील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmuley) ही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीतील (Marathi industry) तिच्या अनुभवाविषयी व्यक्त झाली. यावेळी तिने मराठी इंडस्ट्री आणि त्यातील गटबाजीबद्दल (Groupism) काही धक्कादायक खुलासेसुद्धा केले आहेत. तिच्यासारखे कलाकार, जे इंडस्ट्रीतल्या कुठल्या गटात सक्रिय नसतात, अशा कलाकारांना गटबाजीचा फटका बसतो, असंही ती म्हणाली. भार्गवी सध्या ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. गेल्या काही वर्षांमधील अशी एखादी गोष्ट जी बदलण्याची गरज आहे असं तुला वाटतं, असा प्रश्न भार्गवीला विचारला असता ती इंडस्ट्रीतील गटबाजीविषयी व्यक्त झाली.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतेय आणि इंडस्ट्रीतील एक अशी गोष्ट आहे, जी मला बदलण्याची गरज वाटते. या इंडस्ट्रीत मी गटबाजी पाहिली आहे. एखादं चांगलं पात्र किंवा प्रोजेक्ट आल्यावर लोक फक्त आपल्याच ग्रुपचा विचार करतात आणि फक्त आपल्या जवळच्या लोकांना कास्ट करतात. त्यामुळे माझ्यासारखे कलाकार जे कधीही कोणत्याही गटाचा भाग नव्हते, त्यांना याचा मोठा फटका बसतो. काही प्रोजेक्ट्समध्ये मी अशा भूमिका आणि पात्रं पाहिली आहेत, ज्यांना बघून मला असं वाटलं की त्यांच्याजागी मला संधी दिली असती तर मी खूप चांगलं काम केलं असतं. वेळेनुसार ही परिस्थिती बदलली पाहिजे असं मला वाटतं आणि गटबाजी करणाऱ्यांनी थोडंसं चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे.”
या मुलाखतीत भार्गवी नवोदित कलाकारांविषयीही व्यक्त झाली. “मला असं वाटतं की आताचे कलाकार हे त्यांच्या कामापेक्षा सोशल मीडियावर जास्त लक्ष केंद्रीत करतात. अभिनयाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे आणि नवोदित कलाकारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. कामावर त्यांचं लक्ष असतं, पण ते सोशल मीडियाला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे माझी निराशा होते”, असं ती म्हणाली.
हेही वाचा:
वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
‘राधेश्याम’ फ्लॉप ठरल्यामुळे प्रभासच्या चाहत्याने संपवलं आयुष्य