मेगाभरतीपूर्वी विश्वास नांगरे पाटलांकडून तरुणांना यशाचा मंत्र

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

चंद्रपूर : महाराष्ट्रात आगामी काळात नोकरीची मेगाभरती (Megabharti) होऊ घातली आहे. या स्पर्धा परीक्षात चंद्रपूरचा विद्यार्थी चमकावा यासाठी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा ‘मिशन सेवा ‘ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शहरातील चांदा क्लब मैदानावर […]

मेगाभरतीपूर्वी विश्वास नांगरे पाटलांकडून तरुणांना यशाचा मंत्र
Follow us on

चंद्रपूर : महाराष्ट्रात आगामी काळात नोकरीची मेगाभरती (Megabharti) होऊ घातली आहे. या स्पर्धा परीक्षात चंद्रपूरचा विद्यार्थी चमकावा यासाठी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा ‘मिशन सेवा ‘ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ शहरातील चांदा क्लब मैदानावर आयपीएस अधिकारी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (ips vishwas nangare patil) यांच्या जाहीर युवक संवादाने करण्यात आला. तरुणांच्या गळ्यातले ताईत मानले जाणारे विश्वास नांगरे पाटील विद्यार्थ्यांना मेगाभरतीपूर्वी आता मार्गदर्शन करणार आहेत.

चंद्रपूर ही पराक्रमाची भूमी आहे. या ठिकाणी पराक्रमाचा इतिहास आहे. त्यामुळेच यापूर्वी या जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शौर्य अंतर्गत विमानाच्या उंचीएवढ्या एव्हरेस्टवर चंद्रपूरसह महाराष्ट्राचा झेंडा आणि भारताचा झेंडा फडकवला. चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक गुणवान तयार झाले आहेत. मात्र ही संख्या वाढविण्याचे आपले ध्येय असल्याचं सांगत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रत्येक तालुक्यात वाचनालय तयार करणार असल्याचे  स्पष्ट केले.

चंद्रपूरच्या बछड्यांना स्पर्धा परीक्षा रुपी वाघिणीचे दूध मुनगंटीवार देत आहेत. ही रानफुलांची भूमी आहे, या ठिकाणी विपरित परिस्थितीत काहीतरी भव्यदिव्य करण्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणची मुले यश मिळवतील. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक क्षमता वाढवण्यासाठी हे केंद्र सुरु करण्यात आलंय, असं म्हणत नांगरे पाटलांनी प्रेरणादायी कविता सादर करत विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. विशीत मजा करतो, तेव्हा त्याचं बिल तिशीत फाडावं लागतं. मित्रांचे लग्न झालेले असतात आणि आपण तसेच बसतो. आता टवाळक्या, फेसबुकवर टाईमपास करु नका. म्हातारपणाला उपचारालाही पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आत्ता मेहनत करा, आत्ताच अभ्यास करा, असा कानमंत्र नांगरे पाटलांनी दिला.

यावेळी नांगरे पाटलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी यशाचे सूत्र सांगताना  काय करायचे? नियोजन कसे करायचे? अभ्यास किती वेळेत करायचा? कोणते साहित्य घेऊन करायचा? याचे काटेकोर नियोजन मनात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. चंद्रपूरकर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मेगाभरती

तब्बल आठ वर्षानंतर राज्य सरकारने नोकरभरतीची घोषणा केली. ज्यात यंदा 36 हजार आणि पुढच्या वर्षी 36 हजार पदं भरली जातील. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाणार आहे. पण ही भरती स्थगित करण्यात आली होती.

कोणत्या खात्यात किती जागा
राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्यात 10 हजार 568 पदं, गृह खात्यात 7 हजार 111, ग्रामविकास खात्यात 11 हजार, कृषी खात्यात 2500, सार्वजनिक बांधकाम खात्यात 8 हजार 337, नगरविकास खात्यात 1500, जलसंपदा खात्यात 8227, जलसंधारण खात्यात 2 हजार 423, पशुसंवर्धन खात्यात 1 हजार 47 आणि मत्स्य खात्यात 90 पदं भरली जाणार आहेत.