सचिनला माझे अंत्यसंस्कार करुदे, प्रख्यात गायिकेची आत्महत्या

| Updated on: Feb 18, 2020 | 1:26 PM

आयुष्य संपवण्यापूर्वी सुष्मिताने आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर व्हॉईस मेसेज पाठवला होता. पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं तिने सांगितलं

सचिनला माझे अंत्यसंस्कार करुदे, प्रख्यात गायिकेची आत्महत्या
Follow us on

बंगळुरु : प्रख्यात कन्नड पार्श्वगायिका सुष्मिता राजेने बंगळुरुत गळफास घेऊन आत्महत्या (Singer Sushmitha Raje Suicide) केली. आयुष्य संपवण्यापूर्वी सुष्मिताने आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर व्हॉईस मेसेज पाठवला होता. पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं तिने सांगितलं. तसंच मूळगावी माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असंही सांगितलं.

26 वर्षीय सुष्मिताने सोमवारी आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुष्मिताने नवरा आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सुसाईड व्हॉईस नोटमध्ये म्हटलं आहे.

सुष्मिताचा विवाह जुलै 2018 मध्ये शरत कुमारशी झाला होता. शरत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मात्र लग्नानंतर सासरी हुंड्यासाठी तिचा जाच होत असल्याचं सुष्मिताच्या माहेरच्या कुटुंबाने सांगितलं.

सुष्मिताच्या आत्महत्येनंतर अन्नपूर्णेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पती पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याचा शोध सुरु आहे.

सुष्मिताच्या व्हॉईस मेसेजमध्ये काय?

‘आई, मला माफ कर. शरत त्याच्या आईचं (गीता) म्हणणं ऐकून माझा छळ करायचा. मी माझ्याच चुकांचे परिणाम भोगत आहे. माझ्या सासरचे लोक, शरत, गीता आणि वैदेही माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. मला टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याने त्यांना शिक्षा व्हायला हवी. मी चकार शब्द काढला, तरी मला घराबाहेर जाण्यास सांगायचे. शरत तर इतका हट्टी आहे, त्याने माझं कधीही ऐकलं नाही.’ असं सुष्मिताने सुरुवातीला म्हटलं.

हेही वाचा : पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक

‘मला त्याच्या घरात आयुष्य संपवायचं नाही. मला माझ्या घरी अखेरचा श्वास घ्यायचा आहे. त्यांना शिक्षा झाली नाही, तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आपल्या मूळगावी माझ्यावर अंत्यसंस्कार करा. माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. सचिनला माझे अंत्यसंस्कार करायला सांग. सचिनची काळजी घे, तो नेहमी तुझ्यासोबत असेल’ अशी विनंती सुष्मिताने आईला (Singer Sushmitha Raje Suicide) केली.