…म्हणून सुबोध भावे यानंतर नाटकात काम करणार नाही!

| Updated on: Jul 28, 2019 | 11:47 PM

नाटक सुरु असताना नेहमी प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असतात, तर कधी प्रेक्षकांचं नाटकाकडे कमी आणि मोबाईलकडे जास्त लक्ष असतं. या सर्व प्रकाराला कंटाळून अभिनेता सुबोध भावे याने नाटकात काम न करण्याचा थेट इशाराच दिला.

...म्हणून सुबोध भावे यानंतर नाटकात काम करणार नाही!
Follow us on

मुंबई : नाटक सुरु असताना नेहमी प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असतात, तर कधी प्रेक्षकांचं नाटकाकडे कमी आणि मोबाईलकडे जास्त लक्ष असतं. या सर्व प्रकाराला कंटाळून अभिनेता सुबोध भावे याने नाटकात काम न करण्याचा थेट इशाराच दिला. अनेकदा सांगूनही नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल सातत्याने वाजत असतात, यामुळे सुबोध भावे चांगलाच संतापला आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत, हे असंच चालत राहिलं, तर आपण नाटकात काम करण्याच थांबवणार असल्याचं सांगितलं आहे.

“अनेक वेळा सांगून,विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्हीवर पण बघता येईल”, अशी पोस्ट सुबोधने केली.

सुबोध भावेच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरु आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनेकदा प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असल्याने नाटकात व्यत्यय येतो. त्यामुळे सुबोधने फेसबुकवर आपला संताप व्यक्त केला. नाटक सादर करताना प्रेक्षकांनी लक्ष देऊन ते न पाहणे, म्हणजे आपल्या नाटकात काहीतरी कमी असल्याचं जाणवतं, अशी भावना त्याने या पोस्टमधून व्यक्त केली. त्यामुळे आपण यापुढे नाटकात काम करणार नसल्याचं त्याने सांगितलं.

नाटकादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलवर संताप व्यक्त करणारा सुबोध भावे हा पहिला कलाकार नाही. तर  यापूर्वीही ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सुमीत राघवन, प्रशांत दामले यांसारख्या अनेकांनी नाटकादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलवर संताप व्यक्त केला होता.

पाहा व्हिडीओ :