Seema Deo | ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा ‘अल्झायमर’शी लढा, ‘तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया’ अजिंक्य देवचे भावूक ट्विट!

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘अल्झायमर’ या आजाराने ग्रासले आहे. त्यांचा मुलगा, अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

Seema Deo | ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा ‘अल्झायमर’शी लढा, ‘तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया’ अजिंक्य देवचे भावूक ट्विट!
| Updated on: Oct 14, 2020 | 12:08 PM

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘अल्झायमर’ या आजाराने ग्रासले आहे. त्यांचा मुलगा, अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘सगळे देव कुटुंब तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. ती लवकरच यातून बरी होईल’, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. (Marathi Veteran Actress Seema Deo suffering from Alzheimer Ajinkya Deo Twitted for prayers)

केवळ मराठीच नाही, तर सीमा देव यांनी हिंदी चित्रपट सृष्टीदेखील तितकीच गाजवली. अनेक दशके त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रमेश देव यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. वयाच्या 78व्या वर्षीही त्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत.

अजिंक्य देव यांचे भावूक ट्विट

अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ‘माझी आई, मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव या ‘अल्झायमर’ आजाराशी लढत आहे. आम्ही, संपूर्ण देव कुटुंब ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने तिच्यावर भरभरून प्रेम केले. त्यांनाही मी विनंती करतो की, त्यांनीही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना कराव्यात’, असे भावूक ट्विट करत अजिंक्य देव यांनी त्या लवकरच या आजारातून बऱ्या होतील, असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे. अजिंक्य देव यांच्या या ट्विटनंतर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. ‘सीमा देव यांना लवकर बरे वाटावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे’, अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत (Marathi Veteran Actress Seema Deo suffering from Alzheimer Ajinkya Deo Twitted for prayers)

मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या सीमा देव

शालेय शिक्षण सुरू असतानाच सीमा देव यांनी 1957मध्ये ‘आलिया भोगासी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ‘पडछाया’मध्ये त्या रमेश देव यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. तर, बऱ्याच चित्रपटात रमेश देव त्यांचे सहकलाकार होते. त्यांच्या अभिनयाने गाजलेले ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मोलकरीण’, ‘पडछाया’, ‘अपराध’ हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

मराठी चित्रपटांतून विविधस्पर्शी नायिका साकारत त्या चरित्र भूमिकांकडेही वळल्या व त्याचवेळी त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतही वाटचाल सुरू राहिली. ‘गजब’मध्ये धर्मेंद्रच्या आईची भूमिका साकारल्यावर ‘मजबूर’मध्ये सनी देओलच्या आईची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र, हिंदी चित्रपट सृष्टीतली मनमर्जी कारभार न आवडल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला. काही काळानंतर त्यांनी सगळ्या कामातून ब्रेक घेत, कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. या काळात त्यांनी उत्तम लिखाण केले. यानंतर तब्बल 18 वर्षांनी मुलगा अजिंक्य देव याच्या ‘जेता’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते.

(Marathi Veteran Actress Seema Deo suffering from Alzheimer Ajinkya Deo Twitted for prayers)