नागपूरकरांनो प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडल्यास थेट विलगीकरण कक्षात रवानगी, तुकाराम मुंढेंचे आदेश

| Updated on: May 09, 2020 | 8:18 AM

नागपूर शहरातील कंटेनमेंट झोन परिसरात घराबाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर (Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe) कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत

नागपूरकरांनो प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडल्यास थेट विलगीकरण कक्षात रवानगी, तुकाराम मुंढेंचे आदेश
Follow us on

नागपूर : नागपूर शहरातील कंटेनमेंट झोन परिसरात घराबाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर (Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe) कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास त्यांची रवानगी थेट विगलीकरण कक्षात केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे. याशिवाय नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्यास कठोर कारवाई केली जाईल, असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत (Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिसांना आणखी कठोर कारवाई करण्याची सूचना केली. नागपुरात पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही असा पोलीस बंदोबस्त करा, असं आवाहन मुंढेंनी केलं. याशिवाय नागरिकांनीदेखील सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. नागपुरात काल ( 8 मे) दिवसभरात आणखी दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा थेट 270 वर पोहोचला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. आतापर्यंत 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, संचारबंदी असतानाही काही नागरिक परिस्थितीला गांभीर्याने घेत नसल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढला?

राज्यात सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात होती. सुरुवातीला नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपूरच्या संतरंजीपुरा परिसरात 68 वर्षीय कोरोनाबाधित मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पाहतापाहता आकडा वाढतच गेला.

मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.

या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. इथल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात एका दिवसात 12 कोरोनाबळी, मृत्यूदर जैसे थे! पुणेकरांची चिंता कायम