नवी मुंबई एपीएमसीची समिती स्थापन, अखेर द्राक्षांची निर्यात सुरु, तीन दिवसात हजारो टन द्राक्षे युरोपला निर्यात

| Updated on: Apr 04, 2020 | 1:13 PM

अनेक दिवासांपासून अडचणीत सापडलेल्या द्राक्ष  (Grapes exported to Europe) उत्पादकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

नवी मुंबई एपीएमसीची समिती स्थापन, अखेर द्राक्षांची निर्यात सुरु, तीन दिवसात हजारो टन द्राक्षे युरोपला निर्यात
Follow us on

नवी मुंबई : अनेक दिवासांपासून अडचणीत सापडलेल्या द्राक्ष  (Grapes exported to Europe) उत्पादकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कोरोनामुळे द्राक्षांची निर्यात थांबविण्यात आली होती. द्राक्ष आणि आंब्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोकण आयुक शिवाजी दौंड यांनी पुढाकार घेतला. नवी मुंबई एपीएमसी बाजार प्रशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर फळांची वाहतूक पूर्वपदावर आली आणि द्राक्षांची निर्यात पुन्हा सुरु करण्यात आली. त्यामुळे तीन दिवसात हजारो टन द्राक्षे युरोपला निर्यात करण्यात आले (Grapes exported to Europe).

या समितीमध्ये कस्टम, जेएनपीटी, एपीएमसी प्रशासन, पणन अधिकारी, पोलीस, वाहतूक, एमआयडीसी, लॉजीस्टिकचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. वाहतूक आणि निर्यातीत होणारा अडथळा दूर करण्यासाठी या समितीकडून 022-27889191 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. कुठल्याही निर्यातदारला निर्यातीत अडथळा आल्यास या नंबरवर संपर्क करण्याचं आव्हान बाजार प्रशासनतर्फे करण्यात आलं आहे. त्यामुळे द्राक्ष, आंबा विक्री आणि त्यांच्या निर्यतीसाठी दिलासादायक वातावरण दिसून येत आहे.

द्राक्षांची निर्यात पुन्हा सुरु होऊन साधारण चार दिवस झाले आहेत. आतापर्यंत 25 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चालू वर्ष निर्यातीसाठी सुमारे 38 हजार द्राक्ष बांगांची नोंदणी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात सुरु केली होती.

राज्यातून 21 मार्चपर्यंत जवळपास 78 हजार टन द्राक्ष नेदरलँड, युके, जर्मनीला पाठविण्यात आले होते. त्यानंतर शासनाने कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्याने निर्यात थांबविण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक बाजारातही दर कमी मिळत होता. लॉकडाऊनच्या स्थितीमुळे खरेदीदार बाहेर पडत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. आता संबंधित विभागाच्या समन्वयाने निर्यात सुरु झाली आहे.

1 एप्रिलपर्यंत युरोपला 79 हजार 500 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यात सुरु झाल्यानंतर 30 मार्च रोजी द्राक्षाचे 38 कंटेनर युरोपला पाठविण्यात आले. तर 31 मार्चला 19 तर एप्रिलला 11 असे एकूण 68 कंटनेर द्राक्ष निर्यात झाली आहे. राज्यातून सर्वाधिक निर्यात सांगली आणि नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यासह सोलापूर, लातूर, याभागातून निर्यात झाली. पण नाशिक सांगलीच्या तुलनेने कमी आहे.

दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत उत्पादक ते ग्राहक अशी गटांमार्फत विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे परवानेही मिळवून देण्यासाठी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये फळे आणि भाजीपाला त्याचबरोबर खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल यांचाही समावेश केला आहे. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले कंटनेर चालू ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईतील जेएनपीटी बंदर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा आणि द्राक्ष उत्पादका शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा मिळणार आहे.