पर्रिकर गडकरींना म्हणाले होते, हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17 मार्च) निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. मात्र, या आजाराशी काल त्यांची झुंज अपयशी ठरली आणि पर्रिकर काळाच्या पडद्याआड गेले. गोव्यात आज पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोहर पर्रिकरांच्या निधनाने भाजपने एक मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या […]

पर्रिकर गडकरींना म्हणाले होते, हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल...
Follow us on

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17 मार्च) निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. मात्र, या आजाराशी काल त्यांची झुंज अपयशी ठरली आणि पर्रिकर काळाच्या पडद्याआड गेले. गोव्यात आज पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोहर पर्रिकरांच्या निधनाने भाजपने एक मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

पर्रिकरांच्या आठवणीत गडकरी भावूक झाले. “जेव्हा भाजपने मला गोव्याची जबाबदारी दिली होती, तेव्हा मनोहर पर्रिकर, श्रीपाद नाईक, संजीव देसाई आणि दिगंबर कामत या चौघांच्या टीमसोबत मी काम केलं. मी पर्रिकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात पाहिली आहे”, असे गडकरी म्हणाले.

पर्रिकरांच्या आठवणीत गडकरींनी त्यांच्या साधेपणाचा आणि त्यांच्या नम्र स्वभावाचा एक किस्सा सांगितला. “आयआयटी शिक्षित असूनही त्यांचं राहाणीमान अगदी साधं होतं. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या राहाणीमानात, स्वभावात कुठलाही बदल झाला नाही, त्यांनी कधी महागडे कपडे वापरले नाहीत. जसे ते आधी राहायचे तसेच ते मुख्यमंत्री झाल्यावरही होते आणि संरक्षण मंत्री झाल्यावरही ते तसेच राहायचे. जेव्हा मनोहर पर्रिकर हे दिल्लीला आले, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आपले कपडे बदलून घ्या, इथे खूप थंडी असते. हाफ शर्ट दिल्लीमध्ये चालणार नाही. तेव्हा ते म्हणाले की, मी असाच राहणार.”

नितीन गडकरी यांनी पर्रिकरांसोबत घालवलेल्या क्षणांनाही उजाळा दिला. “पणजीमध्ये मांडवी नदीवर एक मोठा पूल बांधण्यात आला. या पुलाच्या उद्घाटनासाठी पर्रिकरांनी मला आमंत्रण दिले. तुम्ही या पुलाच्या उद्घाटनासाठी यावं अशी माझी इच्छा असल्याचं पर्रिकर म्हणाले. हा माझ्या आयुष्यातील असा कार्यक्रम आहे, जिथे माझी जायची इच्छा आहे. हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले होते. या कार्यक्रमाला ते खुर्चीवर बसून आले. त्यांनी दोन मिनिटांपर्यंत भाषणही दिलं. उद्घाटन झालं आणि ते निघाले”, असे सांगत गडकरींनी पर्रिकरांची आठवण केली.

“पर्रिकरांच्या निधनाने माझ्या व्यक्तीगत जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे गोव्याला समर्पित केलं. त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती अनेकदा मला आश्चर्यचकित करुन सोडायची. त्यांचं निधन माझ्यासाठी अत्यंत दु:खदायक प्रसंग आहे”, असे म्हणत गडकरींनी मनोहर पर्रिकरांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं.


संबंधित बातम्या : 

IIT शिक्षित पहिले आमदार ते संरक्षणमंत्री, पर्रिकरांचा प्रवास

मनोहर पर्रिकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या गोष्टी

संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांचे दोन निर्णय, देश कधीही विसरणार नाही!

स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी