Dharavi Pattern | धारावीतील कोरोना पॅटर्नची ‘ऑक्सफर्ड’कडून दखल, तर अहमदनगरच्या सुपुत्राचेही कौतुक

| Updated on: Oct 08, 2020 | 2:11 PM

ओदिशातील गंजामचे जिल्हाधिकारी असलेले अहमदनगरचे सुपुत्र विजय कुलांगे यांच्या कामाची ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून दखल घेण्यात आली आहे.

Dharavi Pattern | धारावीतील कोरोना पॅटर्नची ऑक्सफर्डकडून दखल, तर अहमदनगरच्या सुपुत्राचेही कौतुक
Follow us on

मुंबई : जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ -WHO) आणि जागतिक बँकेपाठोपाठ (वर्ल्ड बँक- World Bank) आणखी एका बड्या संस्थेने धारावीच्या कोरोना पॅटर्नची दखल घेतली आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला. त्याचप्रमाणे ओदिशातील गंजामचे मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या कामाचीही दखल घेण्यात आली आहे. (Oxford University praises Dharavi Pattern and Ganjam Collector Vijay Kulange work to prevent Corona)

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लहान भागांवर लक्ष केंद्रित करायला हवे, ही बाब ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 310 शहरांचा अभ्यास केल्यानंतर कबूल केली. ओदिशातील गंजाम आणि महाराष्ट्रातील धारावीकडून हे शिकता येऊ शकते. तिथे हजारो जण कोरोनाग्रस्त होते, मात्र आजच्या घडीला तिथे 200 पेक्षाही कमी रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनंतर नुकतंच जागतिक बँकेनेही धारावी मॉडेलचं कौतुक केलं होतं.

ऑक्सफर्ड आणि पूर्वोत्तर विद्यापीठांच्या टीमने याविषयी संशोधन केले होते. घनदाट लोकसंख्या असलेल्या लहान वस्तीत कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर आले. खेड्यांच्या तुलनेत शहरी भागात संसर्ग वेगाने पसरत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. माद्रिद आणि लंडनसारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या भागाकडे लक्ष न दिल्याने कोरोना संसर्ग वाढला. प्रत्येक शहरासाठी सारखी पद्धत असेलच असे नाही, परंतु स्क्रीनिंगची पद्धत सारखीच असावी, असंही ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटलं आहे.

गंजाममध्ये काय झालं?

ओदिशाच्या गंजाम जिल्ह्यात दोन मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. ऑगस्टमध्ये कोरोना वाढीचा दर 59 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे आता 20 हजार 430 रुग्णांपैकी 98 टक्के संपूर्ण बरे झाले आहेत. केवळ 188 रुग्ण बाधित आहेत.

कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी सरपंचांचे हात बळकट करण्यात आले. प्रत्येक गावात कोव्हिड मॅनेजमेंट कमिटी तयार करण्यात आली. त्यांनी घरोघरी जाऊन सहा वेळा स्क्रीनिंग केली. नियम न पाळणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एक हजारांहून अधिक स्वयंसेवकांची यंत्रणा कामाला लागली. पाच गावांमध्ये एक रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली.

गंजामचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे हे मूळ अहमदनगरचे. राळेगण म्हसोबा हे त्यांचे गाव. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कुलांगेंचे कौतुक केले होतेच. मात्र जागतिक स्तरावरही त्यांची दखल घेण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीत लोकसहभाग, स्थानिक स्तरावरील उपाययोजना यांचा उपयोग करुन प्रभावीपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखल्याचं मत जागतिक बँकेने व्यक्त केलं होतं. जागतिक बँकेच्या एका अहवालात मुंबईतील कोरोना नियंत्रणाची विशेष दखल घेण्यात आली आहे. (Oxford University praises Dharavi Pattern and Ganjam Collector Vijay Kulange work to prevent Corona)

धारावी पॅटर्न

धारावी झोपडपट्टी जवळपास 2.5 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसलेली असून या ठिकाणी 6 लाख 50 हजार नागरिक राहतात. गजबजाट आणि गर्दीतील झोपड्या, उघडी गटारं, अरुंद रस्ते अशा परिस्थितीत हे सर्व नागरिक येथे राहतात. अशी आव्हानं असतानाही या ठिकाणी प्रभावीपणे कोरोना नियंत्रणाचं काम झालं. यात सरकारी यंत्रणांसोबतच स्वयंसेवी संस्था, इतर स्वयंसेवक यांनी कोरोना नियंत्रण आणि नागरिकांना मदतीसाठी मोठी मेहनत घेतली आहे.

संबंधित बातम्या :

जगात पुन्हा मुंबई महापालिकेचा डंका, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह बीएमसीबद्दल गौरवोद्गार

मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक

Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत ‘धारावी पॅटर्न’ लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा

(Oxford University praises Dharavi Pattern and Ganjam Collector Vijay Kulange work to prevent Corona)