नोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता

स्वच्छता कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या याच कार्याच्या जाणिवेतून पंजाबमध्ये नागरिकांनी घंटागाडी चालवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर गॅलरीमधून पुष्पवृष्टी, टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली (Punjab Residents thank Garbage Collector).

नोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता
| Updated on: Apr 01, 2020 | 7:42 PM

चंदिगढ : जगभरात थैमान घालणारा कोरोना (Punjab Residents thank Garbage Collector) भारतातही फोफावत चालला आहे. कोरोनाचा सर्वनाश करण्यासाठी देशातील स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशासन जीव ओतून परिश्रम घेत आहेत. हे कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या याच कार्याच्या जाणिवेतून पंजाबमध्ये नागरिकांनी घंटागाडी चालवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर गॅलरीमधून पुष्पवृष्टी, टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. एका व्यक्तीने तर स्वच्छता कर्मचाऱ्याच्या गळ्यात नोटांचा हार घालून कौतुक केलं (Punjab Residents thank Garbage Collector).

स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंगही हेलावून गेले आहेत. त्यांनीदेखील हा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर कोरोनाविरोधाच्या या लढाईत स्वच्छता कर्मचारी सैनिकांप्रमाणेच काम करत आहेत. त्यांचं अशाचप्रकारे मनोबल वाढवलं पाहिजं, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा व्हिडीओ पंजाबच्या पटियाला जिल्ह्याच्या नाभा येथील आहे. स्वच्छता कर्मचारी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घंटागाडी फिरवून कचरा गोळा करत होते. यावेळी लोकांनी आपल्या बाल्कनीतून, छतावरुन स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. यावेळी काही लोकांनी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला. तर एका व्यक्तीने चक्क नोटांचा हार घातला. लोकांकडून होणारे कौतुक बघून स्वच्छता कर्मचारीदेखील भारावून गेले.

पंजाबमध्ये आतापर्यंत 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर कोरोनाने राज्यात 4 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय देशात सर्वात अगोदर पंजाबच्या मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घेतला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेलं पंजाब हे पहिलं राज्य आहे.