सरपंचांच्या मानधनात वाढ हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 31, 2019 | 7:03 PM

शिर्डीत राज्यातील 47 हजार सरपंच आणि उपसरपंचाची परिषद (Sarpanch parishad) पार पडली. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मंत्री, आमदार आणि खासदारही उपस्थित होते. राज्याच्या विकासाबाबत या परिषदेत (Sarpanch parishad) मंथन करण्यात आलं.

सरपंचांच्या मानधनात वाढ हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है : मुख्यमंत्री
Follow us on

शिर्डी : राज्यातील सरपंचांच्या मानधनात नुकतीच वाढ करण्यात आलीय, पण ही वाढ फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं व्हिजन सरपंच आणि उपसरपंचांसमोर मांडलं. शिर्डीत राज्यातील 47 हजार सरपंच आणि उपसरपंचाची परिषद (Sarpanch parishad) पार पडली. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मंत्री, आमदार आणि खासदारही उपस्थित होते. राज्याच्या विकासाबाबत या परिषदेत (Sarpanch parishad) मंथन करण्यात आलं.

“2022 पर्यंत प्रत्येकाला घर”

गावातल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली आहे. हागणदारी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी चांगल्या प्रमाणात काम झालंय. आवास योजनेच्या माध्यमातूनही सात लाखांपेक्षा जास्त घरे बांधली गेली आहेत. राज्यातील सर्व बेघर असणाऱ्यांना 2022 पर्यंत घर देणार असून प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचं घर असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“जलयुक्त शिवारचा फायदा”

राज्यातील जलयुक्त शिवारच्या कामामुळे दुष्काळावरही मात झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जलशिवारमुळे गावागावांना शाश्वत पाणी मिळालंय. महाराष्ट्रातील सरपंचांनी आज अनेक गावं आदर्श केली. जुन्या काळात सरपंच म्हटलं की निळू फुलेच दिसायचे. आता मात्र सुशिक्षित तरूण आणि महिला सक्षमपणे काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

“पिक्चर अभी बाकी है..”

सरपंचांची मानधन वाढ हा ट्रेलर आहे …पिक्चर अभी बाकी है… असं म्हणत अजूनही सरपंचासाठी अनेक निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिर्डीतील सरपंच परिषदेमध्ये सांगितलं. पुन्हा युतीचंच सरकार येणार असून राहिलेल्या समस्या नव्या सरकारमध्ये सोडवणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सरपंचांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, सरपंचांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केलंय. सरपंच परिषदेत मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने समाधानकारक आहेत. मात्र उर्वरित सरपंच परिषदेच्या मागण्यांसाठी परिषदेच्या वतीने संघर्ष सुरूच राहिल. नुसतं मानधन नाही, तर सरकार दरबारी सरपंचांना मान-सन्मान मिळावा, अशी आमची मनस्वी इच्छा असल्याचं सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.