मध्यरात्री पक्षप्रवेश, लगेचच उमेदवारी, ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी शिंदेंनी उमेदवार बदलला; नेमकं चाललंय तरी काय?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधील वॉर्ड १९२ मध्ये शिंदे गटात मोठे बंड उफाळले आहे. ठाकरे गटातून आलेल्या प्रीती पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कुणाल वाडेकर आणि स्थानिक पदाधिकारी नाराज असून सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रभाग रचनेपासून उमेदवारी वाटपापर्यंत सर्वच आघाड्यांवर राजकीय पक्षांमध्ये कमालीची रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे डबल नाराजी नाट्य रंगले आहे. मनसेने या वॉर्डमधून यशवंत किल्लेदार यांना रिंगणात उतरवले आहे. यानंतर ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख प्रकाश पाटणकर आणि त्यांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांनी शिंदे गटात प्रवेश करुन या प्रभागाचे तिकीट मिळवल्याने अनेक शिवसैनिक नाराज झाले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी जमिनीवर काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी दिल्याने शिंदे गटासमोर आता आपल्याच बालेकिल्ल्यात अंतर्गत बंडाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
प्रकाश पाटणकर यांना मध्यरात्री पक्षात प्रवेश
मुंबईतील दादरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गट आणि महायुतीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. मनसेने या वॉर्डमधून यशवंत किल्लेदार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलली. मनसेच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख प्रकाश पाटणकर यांना मध्यरात्री पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांना तातडीने उमेदवारीचा एबी फॉर्म बहाल केला.
या एका निर्णयामुळे महायुतीतील आणि विशेषतः शिंदे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. गेली वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांना डावलण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेल्या उमेदवाराला झुकते माप दिल्याने शिवसेना शिंदे गट संतापाची लाट उसळली आहे. दादरच्या बालेकिल्ल्यातच उपमुख्यमंत्र्यांना आता अंतर्गत बंडाचा सामना करावा लागत आहे.
कोण कोण नाराज?
या वॉर्डमधून माजी आमदार सदा सरवणकर यांचे खंदे समर्थक आणि विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, ऐनवेळी बाहेरून आलेल्या पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने वाडेकर यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे सदा सरवणकर यांच्या गटात मोठी नाराजी उफाळून आली आहे. या वॉर्डमधून विधानसभा प्रमुख व इच्छुक उमेदवार कुणाल वाडेकर, उपविभाग प्रमुख निकेत पाटील आणि शाखाप्रमुख अभिजित राणे इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट न दिल्याने ते नाराज झाले आहेत.
कुणाल वाडेकर यांच्यासह निकेत पाटील आणि अभिजित राणे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना झुकते माप दिले जात असेल, तर आम्ही काम कसे करायचे? असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे वॉर्ड १९२ मधील शिवसेनेचे अनेक शाखा पदाधिकारी आता सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असून, यामुळे शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
