अमेरिकेतील भारतीयांनी अमेरिकन खासदाराला माफी मागायला लावली

| Updated on: Aug 13, 2019 | 9:46 PM

न्यूयॉर्कचे खासदार टॉम सुझ्झी (US Congressman Tom Suozzi) यांनी माफी मागितली आणि भारतीय समुदायाला विचारात न घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो यांना पत्र लिहून काश्मीरमधील मानवाधिकारांविषयी टॉम सुझी यांनी भारतावर आकस दाखवला होता.

अमेरिकेतील भारतीयांनी अमेरिकन खासदाराला माफी मागायला लावली
Follow us on

वॉशिंग्टन : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्यानंतर अमेरिकेतील एका खासदाराने (US Congressman Tom Suozzi) भारताविरोधात वक्तव्य केलं होतं. यानंतर अमेरिकेतील भारतीय समुदाय चांगलाच संतापला. यानंतर न्यूयॉर्कचे खासदार टॉम सुझ्झी (US Congressman Tom Suozzi) यांनी माफी मागितली आणि भारतीय समुदायाला विचारात न घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो यांना पत्र लिहून काश्मीरमधील मानवाधिकारांविषयी टॉम सुझी यांनी भारतावर आकस दाखवला होता.

सामाजिक अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे, असं म्हणत टॉम सुझ्झी यांनी पत्र लिहिलं. जम्मू काश्मीरच्या स्वायत्ततेवरील नवीन आदेश हे दहशतवादाला बळ देणार असल्याचंही या पत्रात म्हटलं होतं. हे पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर भारतीय समुदायाचा तीव्र संताप झाला. कारण, टॉम सुझ्झी यांना निवडून आणण्यात सर्वात मोठा वाटा भारतीय समुदायाचाच आहे. टॉम सुझ्झी यांच्यासाठी भारतीय समुदायाने प्रचारही केला होता.

भारतीय समुदायासमोर माफी मागितली

भारतीय समुदायाच्या तीव्र संतापानंतर टॉम सुझ्झी यांनी तातडीची बैठक बोलावली, ज्यासाठी 100 भारतीय प्रतिनिधी उपस्थित होते. परराष्ट्र सचिवांना लिहिलेलं पत्र तातडीने मागे घेण्यात यावं, अशी मागणी भारतीय समुदायाकडून करण्यात आली. यानंतर टॉम सुझ्झी यांनी प्रतिक्रिया जारी करत माफी मागितली.

काश्मीरमधील निर्णयाबाबत मी जे पत्र लिहिलं ती माझी चूक होती आणि मी त्याबाबत माफी मागायलाच हवी. पत्र लिहिण्यापूर्वी मी भारतीय समुदायाला विचारात घेतलं नाही. मी हे पत्र पाठवण्यापूर्वी भारतीयांना भेटलो असतो, तर माझं मत वेगळं असतं, असं स्पष्टीकरण टॉम सुझ्झी यांनी दिलं.

माझ्या सार्वजनिक जीवनात मी कायम भारत आणि भारताच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधात भारताच्या लढाईत कायम त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे. येत्या 50 वर्षात अमेरिका आणि भारताचे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, अमेरिकन काँग्रेस हे संबंध आणखी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही टॉम सुझ्झी म्हणाले.

“माईक पॉम्पियो यांनीही उत्तर द्यावं”

टॉम सुझ्झी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं स्वागत करत ही योग्य प्रतिक्रिया असल्याचं अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या समितीचे अध्यक्ष जगदीश सेहवानी म्हणाले. आता टॉम सुझ्झी यांनी माईक पॉम्पियो यांना पत्र लिहून पॉम्पियो यांच्याकडूनही प्रतिक्रिया यावी, अशी अपेक्षाही जगदीश सेहवानी यांनी व्यक्त केली.

अमेरिकेतील भारतीयांचा दबदबा

अमेरिकेतील भारतीय समुदायाची ताकद सर्वात मोठी मानली जाते. यामुळेच 2016 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय समुदायाशी जवळीक साधली होती. मंदिरांमध्ये जाणं, भारतीय संस्कृतीवर भाषणं असाही प्रचार ट्रम्प यांनी केला होता. पंतप्रधान मोदी ज्या देशात जातील तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधत असतात. अमेरिकेतील भारतीय समुदायामध्येही पंतप्रधान मोदी लोकप्रिय आहेत. सप्टेंबरमध्ये मोदी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भारतीय समुदायालाही संबोधित करतील. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 40 हजार जागा बूक झाल्या आहेत.