Weather: मराठवाडा गारठला, परभणीत पारा 7 अंशांवर, आणखी किती दिवस राहणार थंडीची लाट?

मराठवाड्यात यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच तापमानाचा पारा एवढा घसरला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडसह इतर भागातील नागरिकांना थंडीसह वाऱ्याचाही सामना करावा लागतोय. मात्र रबी पिकांसाठी हे वातावरण पोषक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Weather: मराठवाडा गारठला, परभणीत पारा 7 अंशांवर, आणखी किती दिवस राहणार थंडीची लाट?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 10:38 AM

औरंगाबादः मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यातील तापमान हळू हळू घसरू लागले असून थंडीचा जोर चांगलाच वाढतोय. काल दिवसभर नागरिकांना हुडहुडी भरल्याची जाणीव होत होती. तसेच सकाळच्या वेळी तसेच सायंकाळच्या वेळी थंड वारे सुटत असल्याने हे वारे अधिक झोंबणारे वाटत आहे.

परभणीत सर्वाधिक थंडी

परभणीचा पारा मराठवाड्यात सर्वात खाली घसरला आहे. बुधवारी परभणीत नोंदवलेले 7.० अंश सेल्सियस हे तापमान या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान आहे. परभणी शहर आणि परिसरात सकाळच्या वेळी दाट धुक्यांची चादर पहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस तापमानातही घट होताना दिसत आहे. परभणीनंतर नांदेडमधील तापमान घसरलेले दिसून येत आहे. नांदेडमध्ये पारा  9 ते 8 अंशांपर्यंत घसरला. औरंगाबादेतही तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याचे दिसून आले.

शेकोट्या पेटल्या, मसाला दूधाच्या स्टॉलवर गर्दी

मराठवाड्यात यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच एवढी थंडी पडू लागल्याने ग्रामीण भागात, तसेच शहरातील कॉलनी परिसरात ठिक-ठिकाणी शेकट्या पेटवल्या जात आहेत. शहरात संध्याकाळ नंतर बहुतांश नागरिक घरातच राहणे पसंत करतायत. तर बाहेर पडलेले लोक मसाला चहा आणि मसाला दूधाच्या स्टॉलवर चहा आणि दूधाचा आस्वाद घेत आहेत.

बीड जिल्हामध्येही हुडहुडी कायम

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने बीड जिल्ह्यात हवेत गारठा पसरला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध भागात ढगाळ वातावरण पहावयास मिळाले. अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे थंडी वाढली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी माजलगावसह जिल्ह्यातील नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.

थंडीनं मध्येच ब्रेक का घेतला होता?

एरवी हिवाळा सुरु होतो तेव्हा नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते. पण या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माम झाल्याने मराठवाड्यात अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापामानातही वाढ झाली होती. आता ढगांचे सावट दूर झाल्याने तापमान घसरू लागले असून थंडीचा जोरही वाढत आहे.

थंडी आणखी वाढणार की कमी होणार?

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ कैलास दाखोरे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसात थंडीचा जोर कमी होत जाईल आणि हळू हळू तापमानातही वाढ होत जाईल.

रबी पिकांसाठी पोषक

रबी हंगामातील गहू, करडी, हरभरा आदी पिकांच्या वाढीसाठी ही थंडी पोषक असल्याचे दाखोरे यांनी सांगितले. त्यामुळे वाढलेली थंडी ही रबी पिकांसाठी आरोग्यदायी व चांगले लक्षण आहे.

इतर बातम्या-

winter session : राज्य विकणे म्हणजे चहा विकण्यासारखे वाटले? गोपीचंद पडळकरांना अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर

Pro Kabaddi 2021 Time Table Today: बेंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा, किती वाजता, कुठे पाहाल सामना