ढगांच्या राज्यात पोहोचल्याचा भास! महाराष्ट्रातील या घाटात दिसतं स्वर्गासारखं दृश्य

ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवीगार वनराई, धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते. कोल्हापूरमधील आंबा घाटाचं निसर्गसौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे ठिकाण का आहे खास, जाणून घ्या.

ढगांच्या राज्यात पोहोचल्याचा भास! महाराष्ट्रातील या घाटात दिसतं स्वर्गासारखं दृश्य
महाराष्ट्रातील या घाटात दिसतं स्वर्गासारखं दृश्य
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2026 | 4:22 PM

महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. मात्र, काही ठिकाणं अशी आहेत, जिथे गेल्यानंतर निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहवत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाट हे असंच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेला हा घाट हिरवीगार वनराई, खोल दऱ्या, धुक्याची चादर आणि वळणावळणाचे रस्ते यासाठी ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात या परिसराचं सौंदर्य खुलून दिसतं. डोंगरांवरून वाहणारे धबधबे, ढगांमध्ये हरवलेली शिखरं आणि थंडगार वारा यामुळे इथे आल्यावर जणू ढगांच्या राज्यातच पोहोचल्याचा भास होतो.

कुठे आहे आंबा घाट?

आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गावर आहे. हा घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा एक सुंदर भाग आहे. कोल्हापूर ते कोकण प्रवासासाठी हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. पूर्वीच्या काळातही कोल्हापूर आणि कोकण यांच्यातील संपर्कासाठी या घाटाचा वापर केला जात होता. आज हा परिसर निसर्गप्रेमी आणि रोड ट्रिपची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे.

Loading...

पावसाळ्यात आंबा घाटाचं सौंदर्य असतं खास

पावसाळा सुरू झाला की आंबा घाटाचा परिसर हिरवागार होतो. डोंगरांवरून खाली उतरणारे ढग, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली दाट झाडी आणि जागोजागी दिसणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाच्या सरींमध्ये घाटातून गाडी चालवण्याचा अनुभवही अनेकांसाठी अविस्मरणीय ठरतो. विशेष म्हणजे, या परिसरात वर्षभर निसर्गसौंदर्य अनुभवता येतं. पावसाळ्यात हिरवळ आणि धुकं पाहायला मिळतं, तर ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान हवामान तुलनेने आल्हाददायक असतं. त्यामुळे पावसाळी सहलीसोबतच हिवाळ्यातही इथे भेट देता येते.

आसपास पाहण्यासारखी ठिकाणं कोणती?

आंबा घाटाला भेट दिल्यानंतर जवळपासची काही ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणंही पाहता येतात.
– पावनखिंड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाची भूमी. बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची आठवण करून देणारं हे ठिकाण आहे.
– विशाळगड किल्ला : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला ऐतिहासिक किल्ला. इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी खास आकर्षण.
– आंबा परिसर : डोंगर, जंगल आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण.

आंबा घाटाला कसं पोहोचाल?

कोल्हापूरहून रस्तेमार्गे आंबा घाटाकडे जाता येतं. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हा घाट आहे. एसटी बसनेही कोल्हापूर आणि रत्नागिरीदरम्यान प्रवास करता येतो. रेल्वेने येणाऱ्यांसाठी संगमेश्वर रोड हे जवळच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पावसाळ्यात इथे जाताना धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. घाटातील तीव्र वळणं, घसरडे रस्ते आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सावधपणे प्रवास करणं आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us