Diwali 2026 : महागड्या फेशियलची गरज नाही! दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वापरा हा खास फेस पॅक
Diwali Skin Care Tips: दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल, तर त्वचेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. महागड्या ब्युटी ट्रीटमेंटऐवजी काही सोप्या घरगुती उपायांनीही त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते.

दिवाळीत सुंदर आणि तजेलदार दिसावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सणाच्या तयारीत घराची साफ सफाई, सजावट, कपड्यांची खरेदी आणि इतर कामांमध्ये अनेकदा त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष होतं. धूळ, प्रदूषण आणि धावपळीमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. अशावेळी महागड्या फेशियलवर पैसे खर्च करण्याऐवजी घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या उपायांची मदत घेऊ शकता. किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. चला तर जाणून घ्या चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी फेस पॅक कसे बनवावे.
फेस पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
• दीड चमचा बेसन
• चिमूटभर हळद
• टोमॅटोचा गर
• साधारण एक चमचा थंड दही
असा तयार करा फेस पॅक
हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीत दीड चमचा बेसन घ्या. त्यात चिमूटभर हळद, टोमॅटोचा गर आणि साधारण एक चमचा थंड दही घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर टोमॅटोचा गर स्किप करू शकता.
कसा आणि किती वेळ लावावा फेस पॅक?
फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. चेहऱ्यावर मेकअप किंवा इतर स्किन केअर उत्पादने राहणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यानंतर तयार केलेल्या फेस पॅकचा पातळ थर चेहऱ्यावर लावा आणि साधारण १० मिनिटे ठेवा. यानंतर टोमॅटोच्या एका फोडीने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. जोरात घासू नका. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या आणि त्वचेला मॉइश्चरायझर लावा.
आठवड्यातून किती वेळा वापरावा?
हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता. मात्र, प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे वारंवार वापरण्यापूर्वी त्वचेची प्रतिक्रिया लक्षात घेणं आवश्यक आहे.
कोणी घ्यावी विशेष काळजी?
नैसर्गिक पदार्थांमुळेही काही व्यक्तींना त्वचेवर ॲलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. विशेषतः सेंसेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. चेहऱ्यावर लालसरपणा, खाज, जळजळ किंवा पुरळ दिसल्यास त्याचा वापर त्वरित थांबवावा. टोमॅटोमुळे त्वचेला त्रास होत असल्यास ते वापरणं टाळावं.
