Beauty Tips | चमकदार त्वचा हवीय? मग, घरच्या घरी बनवा ‘गुलाब पाणी’..

| Updated on: Jan 04, 2021 | 3:07 PM

अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते.

Beauty Tips | चमकदार त्वचा हवीय? मग, घरच्या घरी बनवा ‘गुलाब पाणी’..
गुलाब पाणी
Follow us on

मुंबई : एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. तसेच, चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते. गुलाब पाण्याचे हे सर्व फायदे जाणून असल्याने आपण ते बाजारातून विकत घेतो. पण, बाजारातील गुलाब पाण्याच्या शुद्धतेची हमी देता येत नाही. अशावेळी जर, तुम्हाला शुद्ध गुलाब पाणी हवे असेल, तर आपण ते घरी सहज तयार करू शकता (Home Made Rose Water recipe for glowing skin).

गुलाब पाणी बनवण्याची कृती :

गुलाब पाणी बनवण्यासाठी 250 ग्रॅम गुलाबच्या पाकळ्या घ्या. (आपल्या घरी पुरेशी फुले असल्यास, त्याच्या पाकळ्या वेगळ्या करा. अन्यथा आपण त्या बाजारातून खरेदी करू शकता.) या पाकळ्य प्रथम कोमट पाण्याने स्वच्छ करा. यानंतर एक लिटर पाण्यात या पाकळ्या घाला. एका प्लेटने हे पाण्याने भरलेले भांडे झाकून नंतर मध्यम आचेवर उकळा. हे पाणी उकळल्यानंतर गॅसची आच कमी करा आणि आणखी काही वेळ उकळू द्या. पाकळ्यांच्या रंगात हलकासा बदल झाल्यावर गॅस बंद करा. यानंतर, पाणी थंड होईपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात राहू द्या (Home Made Rose Water). गाळून हे पाणी एका भांड्यात किंवा बाटलीत भरा आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवा. एका आठवड्यानंतर त्याचा वापर करण्यास सुरुवात करा.

त्वचेला करेल हायड्रेट

गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल.

गुलाब पाण्याचे स्कीन टोनर बनवण्यासाठी…

जर, आपल्याला घरच्या घरी बनवलेले गुलाबाचे पाणी स्किन टोनर म्हणून वापरायचे असेल, तर 100 मिली स्प्रे असलेल्या बाटलीत 85 मिली गुलाब पाणी घ्या. त्यात 8 ते 10 थेंब लव्हेंडर तेल आणि ग्लिसरीन घाला. वापरापूर्वी नेहमी बाटली व्यवस्थित घुसळा. यामुळे सगळे घटक व्यवस्थित मिक्स होतील.

गुलाब पाण्याचे मेकअप रिमूव्हर कसे बनवावे?

जर, आपल्याला मेकअप रिमूव्हर म्हणून गुलाबाचे पाणी वापरायचे असेल, तर दोन चमचे गुलाबपाण्यात एक चमचा नारळाचे तेल टाका. हे मिश्रण एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करेल.

(Home Made Rose Water recipe for glowing skin)

(टीप : कुठलीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

हेही वाचा :