घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा पनीर काठी रोल, टेस्टी आहे ही स्ट्रीट फूड रेसिपी
तुम्हाला संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. स्ट्रीट फूड स्टाईल पनीर काठी रोल घरी कसे बनवायचे जाणून घ्या.

बऱ्याच लोकांना संध्याकाळी चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला आवडते. संध्याकाळची भूक भागवण्यासाठी नेहमीच्या नाश्त्याऐवजी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. ज्यासाठी स्ट्रीट फूड बहुतेक लोकांची पहिली पसंती असते. स्ट्रीट फूड खाण्याची आवड असलेल्या लोकांना मोमोज, चाट किंवा काठी रोल खायला आवडते. जर तुम्हीही स्ट्रीट फूड लव्हर असाल, तर स्ट्रीट फूडची तुमची क्रेविंग तुम्ही घरीच भागवू शकता. ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्ट्रीट फूड स्टाईल पनीर काठी रोल बनवू शकता. येथे वाचा पनीर काठी रोलची रेसिपी.
पनीर काठी रोल बनवण्यासाठी साहित्य
– २५० ग्राम पनीरचे चौकोनी तुकडे – १ मध्यम आकाराचा कांदा – २ लाल-पिवळी शिमला मिरची – १/२ चमचा आले-लसूण पेस्ट – २ चमचे दही – हिरवी चटणी – मेयोनीज – टोमॅटो सॉस – १ चमचा कसुरी मेथी – १ चमचा लिंबाचा रस – १ चमचा काश्मिरी लाल मिरची – १/२ चमचा गरम मसाला – १/२ चमचा हळद – १ चमचा तेल – १ चमचा बटर – चवीनुसार मीठ – २ पराठे
पनीर काठी रोल बनवण्याची पद्धत
स्ट्रीट स्टाईल पनीर काठी रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे चौकोनी तुकडे मॅरीनेट करण्यासाठी पनीरमध्ये सर्व मसाले मिक्स करा. हे मॅरीनेट होण्यासाठी ३० मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात सिमला मिरची, कांदा, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला आणि पनीर घालून हलके परतून घ्या. आता पराठा तयार करा. पराठ्यावर हिरवी चटणी लावा. त्यात आधी तयार केलेले पनीरचे मिश्रण, मेयोनीज आणि सॉस टाका. नंतर वर कांद्याच्या रिंग ठेवा आणि रोल करा. तुमचा चविष्ट पनीर काठी रोल तयार आहे. चटणीसोबत सर्व्ह करा.
