‘या’ आरोग्यदायी पेयांनी तुमच्या दिवसाची करा सुरूवात, दिवसभर राहाल उत्साही
सकाळची सुरुवात एका आरोग्यदायी पेयाने केल्यास तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते.

तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही आरोग्यदायी पदार्थांचे व पेयांचे सेवन करून केल्याने त्याचा परिणाम दिवसभरातील तुमच्या ऊर्जेवर आणि आरोग्यावर होत असतो. रात्रीच्या झोपेनंतर तुमच्या शरीराला पाणी आणि आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. आरोग्यदायी पेयं तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास आणि दिवसाची चांगली सुरुवात करण्यास मदत करू शकतात. कारण या आरोग्यदायी पेयांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात जी तुमच्या शरीराचे पोषण करतात.
दरम्यान अति गोड पेयं, शीतपेयं किंवा जास्त साखर असलेले पॅकेज केलेले सरबत प्यायल्याने शरीरात साखरेचे प्रमाण अतिरिक्त वाढू शकते, ज्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण आजच्या काळात अनेकजण घरगूती पद्धतीने बनवलेले आहाराकडे अधिक लक्ष देत आहेत. तर तुम्हालाही घरी सहज बनवता येणारी अनेक आरोग्यदायी पेयं आहेत जी चव आणि पोषण यांचा उत्तम मेळ साधतात. त्यांची निवड तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार करू शकता. मात्र कोणत्याही पेयासाठी संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. चला, सकाळची सुरुवात करण्यासाठी 5 आरोग्यदायी पेयं कोणती आहेत आणि रिकाम्या पोटी कोणती पेयं पिणे टाळावीत हे आजच्या लेखात जाणून घेऊयात.
तुमच्या दिवसाची सुरुवात या 5 आरोग्यदायी पेयांनी करा
कोमट पाणी
सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी पुन्हा भरण्यास मदत होते आणि रात्रीच्या जागरणानंतर शरीर ताजेतवाने होते. दिवसाची सुरुवात करण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे.
लिंबूपाणी
अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास साध्या किंवा कोमट पाण्यात मिसळून प्या. चवीसाठी हवे असल्यास थोडा पुदिना यामध्ये टाका. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शरीराचे पोषण करण्यास आणि ताजेतवाने वाटण्यास मदत करते.
सत्तू पेय
एका ग्लास थंड किंवा साध्या पाण्यात 2 ते 3 चमचे सत्तू, थोडे भाजलेले जिरे पुड, काळे मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून चांगले ढवळून घ्या. सत्तूमध्ये प्रथिने आणि फायबर असतात, जे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करतात.
नारळाचे पाणी
सकाळी ताज्या नारळाचे पाणी पिणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे शरीराला हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. उष्ण आणि दमट हवामानात नारळ पाणी पिणे विशेषतः फायदेशीर ठरते.
फळे आणि भाज्यांचे स्मूदी
स्मूदी बनवण्यासाठी केळे, सफरचंद, पालक आणि दही किंवा दूध एकत्र ब्लेंड करा. इच्छित असल्यास तुम्ही त्यात चिया सीड्स किंवा अळशीच्या बिया मिक्स करू शकता. हे पेय जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने आणि खनिजांनी समृद्ध असल्यामुळे नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
सकाळी रिकाम्या पोटी कोणती पेयांचे सेवन टाळावेत?
रिकाम्या पोटी जास्त साखर असलेले पॅकेज्ड ज्यूस, शीतपेये, एनर्जी ड्रिंक्स आणि अति गोड शेक्स पिणे टाळा. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आणि आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण कमी असू शकते. रिकाम्या पोटी अति गोड चहा किंवा कॉफी प्यायल्याने काही लोकांना पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
जर तुम्हाला गॅस, आम्लपित्त किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या असेल, तर तुमच्या स्थितीला अनुकूल असे पेय निवडा. तुमच्या शरीराला पाणी, ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवणाऱ्या पेयाने दिवसाची सुरुवात करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)