फक्त 90 हजारात दुबईची सैर, युरोप-जपानच्या टूरची किंमत किती? IRCTC खास पॅकेज एकदा पाहाच

IRCTC आता रेल्वे कॅटरिंगसोबत पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष देत आहे. दुबई, युरोप आणि जपानसह आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज तसेच 'भारत गौरव' ट्रेनद्वारे देशांतर्गत पर्यटन पॅकेजेस उपलब्ध करत आहे.

फक्त 90 हजारात दुबईची सैर, युरोप-जपानच्या टूरची किंमत किती? IRCTC खास पॅकेज एकदा पाहाच
IRCTC Tour Package
| Updated on: Nov 27, 2025 | 7:19 PM

रेल्वे प्रवाशांना कॅटरिंग सेवा पुरवणारी आणि या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) आता मोठ्या प्रमाणात पर्यटन (Tourism) क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. रेल्वे कॅटरिंगमध्ये IRCTC ची प्रमुख ओळख असली तरी ही संस्था आता देशातील आणि परदेशातील प्रवासासाठी आकर्षक आणि स्वस्त दरात रेलटूर पॅकेज उपलब्ध करत आहे. IRCTC नागरिकांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे टूर पॅकेज आयोजित करत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटनावर विशेष भर दिला जात आहे.

आंतरराष्ट्रीय पॅकेजची किंमत किती?

IRCTC ने नुकतेच दुबईसाठी टूर पॅकेज जाहीर केले आहेत. मुंबई, अलाहाबाद, अहमदाबाद यांसारख्या शहरांतून सुमारे २०० प्रवाशांना कमी खर्चात दुबईला घेऊन जाण्याची योजना आहे. ही टूर जानेवारी महिन्यात होणार आहेत. या पॅकेजचा खर्च प्रत्येकी सुमारे ९० हजार रुपये आहे. एप्रिल आणि मे महिन्यात युरोपसाठी टूर आयोजित केले जाणार आहेत. ज्याचा खर्च प्रत्येकी ३ ते ४ लाख रुपये असू शकतो. जपानसाठी देखील याच दरात पॅकेज उपलब्ध आहेत, अशी माहिती IRCTC ने दिली आहे.

त्यासोबतच ऑस्ट्रेलिया, नेपाळ आणि युरोपसह अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज उपलब्ध आहेत. ‘वेस्ट झोन’मधून आतापर्यंत सुमारे २,५०० प्रवाशांना आंतरराष्ट्रीय टूरसाठी घेऊन गेले असल्याची माहिती IRCTC ने दिली आहे.

IRCTC कडून देशांतर्गत पर्यटनासाठी देखील अनेक पॅकेज उपलब्ध आहेत. रण उत्सवासाठी विशेष टूर आयोजित करण्यात आली आहे. ज्यात प्रवासी सहभागी होऊ शकतात. भारत गौरव ट्रेन (Bharat Gaurav Train) सध्या देशात पर्यटकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. १० डिसेंबर रोजी पुणे येथून ‘भारत गौरव’ ट्रेनद्वारे गंगा सागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

IRCTC कडून प्रवाशांच्या सुविधांसाठी अनेक महत्त्वाचे बदल केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय टूरमध्ये जेवणाच्या समस्यांवर लक्ष दिले जाते. काही वेळा पाण्याची समस्या अनेकदा उद्भवते. १४ रुपये दराने पाण्याची बाटली उपलब्ध असून गैरव्यवहारांची तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाते. IRCTC च्या प्रवासात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने असतात. त्यांना योग्य आणि आवश्यक सुविधा पुरवण्यावर विशेष लक्ष दिले जाते.

QR कोडची व्यवस्था

मुंबई ते उत्तर प्रदेश या मार्गावर ओव्हरचार्जिंगच्या तक्रारी अधिक प्रमाणात येत असल्याने, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. वेटर आणि पॅन्ट्री मॅनेजर यांच्या नवीन गणवेशावर हेल्पलाईन नंबर छापण्यात आले आहेत. पैशांची जास्त मागणी होऊ नये यासाठी QR कोडची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून व्यवहार पारदर्शक होतील.

IRCTC कडून रेल्वेमध्ये पुरवल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेसाठी ‘क्लाऊड किचन’ (Cloud Kitchen) ची व्यवस्था करण्यात आली आहे. वंदे भारत आणि राजधानी एक्सप्रेस साठी सुमारे २,५०० लोकांच्या जेवणाची तयारी येथे केली जाते. साधारण रेल्वे प्रवाशांसाठी सुमारे १,००० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था क्लाऊड किचनमध्ये केली जाते. www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा ८२८७९३१८८६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधू शकतात. बुकिंगसाठी IRCTC ने नेमलेल्या ट्रॅव्हल एजंट्समार्फत देखील सोय उपलब्ध आहे.