गणपतीला गावी जाण्याचा प्लॅन करताय? IRCTC तिकीट बुक करताना ‘ही’ खबरदारी नक्की घ्या

सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग आहे आणि गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनी देखील रेल्वे तिकीट बुकिंगची गर्दी सुरू केली आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का ट्रेनचं तिकीट बुक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ? नाही, मग उशीर न करता, चला जाणून घेऊया, गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये ट्रेन बुकिंग करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

गणपतीला गावी जाण्याचा प्लॅन करताय? IRCTC तिकीट बुक करताना ही खबरदारी नक्की घ्या
Train Ticket Booking Tips
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 12:46 PM

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच, कोकणात आपल्या मुळगावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी रेल्वे तिकीट बुकिंगला सुरुवात केली आहे. रेल्वेच्या वेबसाइटवर मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पण अनेक प्रवाशांना अजूनही ऑनलाईन तिकीट बुक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे माहिती नाही. त्यामुळे तिकीट वेटिंगमध्ये राहणं, सीट न मिळणं किंवा रिफंड न मिळणं अशा समस्या उद्भवतात. अशा चुका टाळण्यासाठी ‘या’ सूचना खास तुमच्यासाठी.

ट्रेन बुकिंगपूर्वी ‘या’ सूचना लक्षात ठेवा:

1. तिकीट बुकिंग : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. ट्रेनच्या नियोजित प्रवास तारखेच्या 120 दिवस म्हणजेच 4 महिन्यांपूर्वीपासून तिकीट बुकिंग सुरू होतं. त्यामुळे वेळेवर योजना आखणं आणि सुरुवातीलाच तिकीट बुक करणं केव्हाही फायदेशीर ठरतं.

2. 6 तिकीट : IRCTC च्या नियमांनुसार एक युजर एका वेळी फक्त 6 तिकीट बुक करू शकतो. त्यामुळे मोठा परिवार असल्यास याची योग्य पूर्वतयारी करावी.

3. कन्फर्म तिकीट : जर तुमचं तिकीट कन्फर्म झालं असेल, तर त्यावर स्पष्टपणे सीट नंबर आणि कोच नंबर नमूद असतो. यामुळे गोंधळ टाळता येतो आणि प्रवास सुलभ होतो.

4. तिकीट कॅन्सल : ट्रेन निघण्याच्या कमीत कमी 4 तास आधी तुम्ही तुमचं तिकीट रद्द करू शकता. यानंतर रिफंडसाठी थेट ई-मेलद्वारे विनंती करावी लागते.

5. रिफंड : जर चार्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला तिकीट कॅन्सल करायचं असेल, तर etickets@irctc.co.in या ई-मेलवर सर्व माहिती पाठवा. तपासणी नंतर तुमचं पैसे रिफंड केले जातील.

6. TDR : चार्ट तयार झाल्यानंतरही IRCTC वेबसाइटवरून TDR (Ticket Deposit Receipt) भरून तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता.

7. वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास : जर तुमचं तिकीट वेटिंगमध्ये असेल आणि चार्ट तयार होईपर्यंत ते कन्फर्म झालं नसेल, तर तुम्हाला त्या तिकिटावरून प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, अशा तिकीटाचा रिफंड तुमच्या खात्यावर आपोआप दिला जातो.

वेटिंग आणि RAC तिकीटाचं काय?

वेटिंग (प्रतीक्षा यादी) आणि RAC (Reservation Against Cancellation) असलेल्या तिकीटांचा अंतिम निर्णय ट्रेन निघण्याच्या 4 तास आधी तयार होणाऱ्या चार्टमध्ये ठरतो. त्यात तुमचं तिकीट कन्फर्म झालं की नाही, हे स्पष्ट होतं.