टिफीनमधील तो दुर्गंध घालवायचा असेल तर या 4 टिप्स जरूर वापरून पहा…

| Updated on: May 25, 2023 | 11:27 AM

सतत आणि न आवडणारे दुर्गंध आपल्या टिफीनमध्ये असू शकतात. मात्र त्यामुळे डब्यातील ताज्या अन्नालाही त्याचा वास लागतो. काही टिप्सच्या मदतीने टिफीनमधून येणाऱ्या दुर्गंधापासून मुक्तता मिळू शकते.

टिफीनमधील तो दुर्गंध घालवायचा असेल तर या 4 टिप्स जरूर वापरून पहा...
Follow us on

नवी दिल्ली : अन्न हे पूर्णब्रह्म… असं आपण नेहमी म्हणतो. मात्र बऱ्याच वेळेस असं होतं की हे अन्नपदार्थ आपण जेव्हा डब्यात किंवा टिफीनमध्ये भरून घेऊन जातो, तेव्हा डब्याला अन्नाचा वास लागतो. काही वेळा तो वास पटकन जात नाही आणि डब्यातू एक विशिष्ट दुर्गंध (tiffin odour) येतो. त्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच पण डब्यात पुन्हा भरलेल्या ताज्या अन्नालाही त्याचा वास लागतो आणि ते खाववत नाही. मसालेदार करी, तीव्र वास असणारे घटक,या गंधांपासून मुक्त होणे हे आवश्यक आहे.

काही टिप्सच्या मदतीने तुम्ही टिफीनमधून येणारे हे वास प्रभावीपणे दूर करू शकता. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.

1) कच्चा बटाटा

टिफिन किंवा जेवणाच्या डब्यातून येणारा तिखट वास दूर करण्यासाठी कच्चा बटाटा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याचे जाड काप करून ते टिफिनवर चोळा अथवा टिफीनच्या आतल्या बाजूने घासून घ्या. जेथून वास तीव्र येतो, तेथे जास्त वापर करा. बटाट्यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम वास निष्प्रभ करण्यास मदत करतात. बटाटा चोळल्यानंतर त्याचे काप टिफिनच्या आत ठेवा आणि झाकण बंद करा. रात्रभर बटाटा ठेवल्यास उरलेला गंध शोषला जाईल.

त्यानंतर डब्यातूनल बटाटा काढून टाका आणि कोमट पाण्याने डबा स्वच्छ धुवा. उरलेला वास घालवण्यासाठी साध्या लिक्विड सोपने डबा पुन्हा एकदा धुवून घ्यावा. स्वच्छ झाल्यावर टिफिन पूर्णपणे कोरडा करून घ्यावा. याने वास कमी होण्यास मदत होईल.

2) दालचिनी

दालचिनी ही आनंददायी सुगंध आणि नैसर्गिक दुर्गंधीनाशक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ज्यामुळे टिफिनमधील तीव्र गंध दूर करण्यासाठी ती एक प्रभावी घटक ठरते. त्यासाठी रिकाम्या टिफिनमध्ये एक किंवा दोन दालचिनीच्या काड्या ठेवून झाकण घट्ट बंद करावे. दालचिनीची काडी तीव्र गंध शोषून घेते व डब्यात सुगंध राहतो. किंवा तुम्ही दालचिनीची पावडरही वापरू शकता. टिफीनमध्ये दालचिनीची पावडर टाकून झाकण घट्ट लावा आणि डबा हलवा. त्याने गंध शोषला जाईल. नंतर डबा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. दालचिनी पावडर आणि लिंबाता रस याची पेस्ट लावूनही डबा स्वच्छ करता येतो. त्यामुळे डब्यातील तीव्र वास जाऊन दुर्गंध हळूहळू कमी होतो.

3) लिंबांच्या सालांचा वापर

टिफिनमधून येणारा तिखट वास दूर करण्यासाठी लिंबाची साल एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. साफसफाई आणि दुर्गंधाचा नाश करण्यासाठी लिंबाच्या सालीचा कसा वापर करावा ते जाणून घेऊया.

वापरण्यात आलेल्या लिंबाच साले फेकून न देता गोळा करा व ते पूर्णपणे स्वच्छ धुवा. रिकाम्या टिफिनमध्ये लिंबाची काही साले टाका आणि झाकण घट्ट बंद करून रात्रभर तसेच ठेवा. लिंबाची साले डब्यातील वास शोषून घेतील. टिफिनला उग्र वास येत असेल तर तुम्ही लिंबाच्या सालींचा नैसर्गिक स्क्रब म्हणून वापर करू शकता. तीव्र वास असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करून, टिफिनच्या आतील भागा सालाने घासून घ्या. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मांमुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

दुसरी प्रभावी पद्धत म्हणजे लिंबाची साल आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण तयार करणे. टिफिनमध्ये मूठभर लिंबाची साले ठेवा, त्यावर थोडा बेकिंग सोडा शिंपडा आणि कंटेनर बंद करा. रात्रभर किंवा काही तासांसाठी ते डब्यात ठेवा. त्यानंतर डबा स्वच्छ धुवून तो पूर्णपणे कोरडा करून घ्यावा. या टिप्सच्या मदतीने तुम्ही डब्यातील वास पूर्णपणे घालवू शकता.

4) व्हिनेगरचा वापर

जर तुमच्या टिफिनला उग्र वास येत असेल तर व्हिनेगरचा वापरही प्रभावी ठरतो. त्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

डबा पूर्णपणे रिकामा करून घ्या. व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे . या मिश्रणात टिफीन १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवा. त्याने दुर्गंध कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर ब्रश किंवा स्पंजने डबा घासून स्वच्छ करा व कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर डबा नीट पुसून पूर्णपणे सूर्यप्रकाशात ठेऊन कोरडा करून घ्यावा. या टिप्सचे अनुसरण करून आणि व्हिनेगरचे द्रावण वापरून, तुम्ही तुमच्या टिफिनच्या डब्यातील तीक्ष्ण वास प्रभावीपणे काढून टाकू शकता.