सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर भाज्या टाकून बनवा उत्तपा, वीकेंडची होईल टेस्टी आणि हेल्दी सुरुवात
Breakfast Recipe: जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी नाश्त्यात काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर तुम्ही टेस्टी उत्तपा बनवू शकता. विविध भाज्या टाकून ते बनवता येते. जाणून घ्या सोपी रेसिपी

सकाळचा नाश्ता टेस्टी आणि हेल्दी असेल तर पूर्ण दिवस चांगला जातो. वीकेंडला नाश्त्यात काहीतरी वेगळे खाण्याचा विचार करत असाल तर उत्तपाची ही रेसिपी नक्की ट्राय करा. भरपूर भाज्या टाकून बनवलेला हा उत्तपा खायला टेस्टी तर आहेच शिवाय तो हेल्दी देखील आहे. तसं तर उडीद डाळ आणि तांदूळच्या बॅटरपासून उत्तपा बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला रव्यापासून बनवलेल्या उत्तपाची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी व्हेजिटेबल उत्तपाची रेसिपी.
व्हेजिटेबल उत्तपा बनवण्यासाठी साहित्य
– रवा – २ कप
– दही – २ कप
– एक लहान टोमॅटो बारीक चिरून
– एक लहान कोबी बारीक चिरलेली
– एक लहान शिमला मिरची बारीक चिरलेली
– हिरवी मिरची बारीक चिरलेली
– आले किसलेले
– कोथिंबीर बारीक चिरून
– मोहरी अर्धा टीस्पून
– तेल – ४-६ चमचे
– मीठ चवीनुसार
व्हेजिटेबल उत्तपा बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात रवा घ्या. नंतर त्यात दही घालून मिक्स करा. जाडसर पीठ तयार करा. नंतर त्या बॅटरमध्ये मीठ, आले, हिरवी मिरची घालून मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवा म्हणजे पीठ तयार होईल. जर बॅटर खूप घट्ट असेल तर त्यात पाणी घाला आणि नंतर इनो फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करा. उत्तपा बनवण्याचे पीठ तयार आहे. आता सर्व भाज्या घाला आणि मिक्स करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात बीट, गाजर सुद्धा घालू शकता.
नंतर गॅसवर नॉन-स्टिक पॅन ठेवा आणि गरम करा. आता हे बॅटर गरम तव्यावर ओता आणि चमच्याने एकसारखे पसरवा. त्यावर थोडे तेल घाला आणि दोन्ही बाजूंनी शिजवा. जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखे उत्तपा बनवायचे असेल तर भाज्या पीठात घालू नका. तव्यावर बॅटर पसरवा आणि नंतर त्यावर भाज्या पसरवा. दोन्ही बाजूने नीट शिजवा. तुमचा टेस्टी आणि हेल्दी व्हेजिटेबल उत्तपा तयार आहे.
