Hair Oil: लांबसडक, दाट आणि चमकदार केस हवेत? कढीपत्ता आणि मेथीपासून बनवा हे खास तेल

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या ऋतूत घरगुती तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या हे तेल कसे बनवायचे.

Hair Oil: लांबसडक, दाट आणि चमकदार केस हवेत? कढीपत्ता आणि मेथीपासून बनवा हे खास तेल
Hair Care
| Edited By: | Updated on: Nov 16, 2026 | 2:48 PM

हिवाळा सुरू झाला की वातावरणातील थंडावा आणि कोरडेपणाचा परिणाम त्वचेप्रमाणेच केसांवरही दिसून येतो. या दिवसांत अनेकांना केसांमध्ये कोंडा होणे, केस गळती वाढणे, केस कोरडे आणि निस्तेज दिसणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या कमी करण्यासाठी केसांना नियमित तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, बाजारात वेगवेगळ्या प्रकारची तेलं उपलब्ध असल्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी नेमके कोणते तेल वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी महागड्या हेअर ऑइलवर पैसे खर्च करण्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक घटकांचा वापर करून खास तेल तयार करू शकता. कढीपत्ता आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे तेल केसांची योग्य काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया हे तेल बनवण्याची सोपी पद्धत.

घरी हेअर ऑइल बनवण्यासाठी साहित्य

खोबरेल तेल – १ लीटर

Loading...

कढीपत्ता – २५ ते ३० पानं

मेथी दाणे – १ टीस्पून

जास्वंदाची फुले – १५ ते २०

कडुलिंबाची पाने – २५ ते ३०

कांदे – ३ मध्यम आकाराचे

कोरफडीचे पान – १ मध्यम आकाराचे

चमेलीची फुले – १५ ते २०

कसे बनवावे हेअर ऑइल?

हेअर ऑइल तयार करण्यासाठी सर्वप्रथम मेथीचे दाणे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कोरफडीचे छोटे तुकडे करून घ्या. मेथीचे दाणे चांगले भिजल्यानंतर कोरफडीचे तुकडे आणि इतर साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. आता एका पातेल्यात शुद्ध खोबरेल तेल गरम करून त्यात तयार केलेली पेस्ट घाला. हे मिश्रण मंद आचेवर सुमारे ४५ मिनिटे शिजू द्या. मिश्रणाचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या. शेवटी हे तेल स्वच्छ कपड्याने किंवा गाळणीने गाळून काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

हेअर ऑइल वापरताना कोणती काळजी घ्यावी?

घरगुती हेअर ऑइल वापरण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूला थोडे तेल लावून पॅच टेस्ट करा. यामुळे त्वचेवर खाज, जळजळ किंवा ॲलर्जी होते का, हे समजते. केसांच्या प्रकारानुसार योग्य प्रमाणात तेल लावा. तेल साठवण्यासाठी स्वच्छ आणि कोरडी काचेची बाटली वापरा. तेलाचा रंग किंवा वास बदलल्यास त्याचा वापर करू नका. तसेच टाळूवर जखम किंवा जळजळ असल्यास तेल लावणे टाळा. कोंडा किंवा केसगळतीची समस्या सतत जाणवत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us