पाचव्या मजल्यावरून लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली; 8 जण गंभीर जखमी, नालासोपाऱ्यात भरदुपारी खळबळ
नालासोपाऱ्यामध्ये एका इमारतीत लिफ्ट कोसळली आहे. यामध्ये ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊ..

सात मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून आठ जणांना घेऊन खाली येणारी लिफ्ट अचानक वेगाने तळमजल्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत लिफ्टमधील आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथील पाटणकर पार्क परिसरात धनंजय ॲव्हेन्यू नावाची सात मजली इमारत आहे. शनिवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास आठ जण या इमारतीतील लिफ्टने पाचव्या मजल्यावरून तळमजल्यावर येत होते. मात्र, अचानक लिफ्ट वेगाने खाली कोसळली. तळमजल्यावर आदळल्यानंतर लिफ्टला जोरदार धक्का बसला आणि मोठा आवाज झाला.
रहिवाशांनी दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले
लिफ्ट कोसळल्याचा आवाज ऐकताच इमारतीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर रहिवाशांनी मोठ्या प्रयत्नाने लिफ्टचा दरवाजा तोडला आणि जखमींना बाहेर काढले. त्यानंतर सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ही इमारत जुन्या वास्तूचे नूतनीकरण करून उभारण्यात आली आहे. सोसायटीचे अध्यक्ष समीर धोंडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने लिफ्टमध्ये स्प्रिंग यंत्रणा बसवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, ही यंत्रणा असतानाही लिफ्ट कोसळल्याने तिच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.