हत्या करुन दुचाकीसह तरुणाचा मृतदेह जमिनीत पुरला, तिघांना अटक

नागपूरमध्ये एका 32 वर्षीय तरुणाची निघृणपणे हत्या करुन त्याला दूचाकीसह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (Nagpur youth murder).

Nagpur youth murder, हत्या करुन दुचाकीसह तरुणाचा मृतदेह जमिनीत पुरला, तिघांना अटक

नागपूर : नागपूरमध्ये एका 32 वर्षीय तरुणाची निघृणपणे हत्या करुन त्याला दुचाकीसह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (Nagpur youth murder). या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव पंकज गिरमकर असे असून सुरुवातीला तो हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा हे प्रकरण मिसिंगचे नसून आणखी मोठे असल्याचा संशय त्यांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अचंबित करणारी माहिती उघडकीस आली (Nagpur youth murder).

पंकज गिरमकर हा तरुण नागपूर भंडारा मार्गावरील कापसी येथील हल्दीराम फूड कंपनीत टेक्निशियन या पदावर कार्यरत होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलासह कापसी परिसरातच भाड्याच्या घरात राहात होता. मात्र डिसेंबर 2019 मध्ये तो वर्ध्याला राहायला गेला. गेल्या 29 डिसेंबरपासून तो बेपत्ता होता. दोन दिवस पंकजसोबत संपर्क होऊ न शकल्यामुळे त्याच्या बहिणीने नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. पंकजच्या नातेवाईकांनी पोलिसांना काही संशयितांची नावे दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती त्यांच्या हाती लागली. या माहितीमुळे नागपूरच्या भंडारा मार्गावरील कापसी येथे 12 फूट खड्ड्यात पंकज गिरमकरचा मृतदेह सापडला. यावेळी त्याची दूचाकीदेखील खड्ड्यात आढळली.

याप्रकरणी पोलिसांनी कापसी येथील एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने पोलिसांना माहिती दिली की, पंकजचा मृतदेह त्यांनी कापसी येथील जोगिंदर सिंग ढाब्याशेजारी 12 फूट खोल खड्डा खोदून त्याठिकाणी पुरलेला आहे. एवढंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी पंकजची मोटारसायकलसुद्धा त्या खड्यात पुरली असल्याची माहिती त्याने दिली. आरोपीने दाखवलेल्या ढाब्यातुन पोलिसांनी पंकजचा मृतदेह आणि दुचाकी बाहेर काढली. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा मालकासह दोन जणांना अटक केली असून आरोपींनी पंकजची हत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *