
मुंबई, दि.20 जानेवारी 2024 | मुंबईत येण्यासाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज निघणार आहेत. त्यांची आंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. २६ जानेवारी किंवा आजपासूनच ते उपोषण करणार आहे. अंतरवली सराटीतून ते एकटे निघत असून राज्यभरातून कोट्यवधी मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत निघण्यासाठी बीडमधून हजारो मराठा बांधव आंतरवलीकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हजारो मराठे पदयात्रेसाठी निघाले आहेत. आरक्षण घेवूनच आम्ही परतू, असा विश्वास मराठा बांधवांनी यावेळी बोलून व्यक्त केला आहे.
अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात येणार आहे. अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी वळवली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेकडो तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत. या तरुणांनी आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे अशा घोषणा देत भाकरी, रेशन, किराणा असे एक महिन्याचे साहित्य घेत मुंबईकडे रवाना झाले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर गेल्या अनेक महिन्यांपासून विविध स्वरूपाचे आंदोलने सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर आणि तालुक्यातील हजारो मराठा बांधव देखील आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. नगर जिल्हयातील सुपा येथे मनोज जरांगे 23 जानेवारी रोजी पोहचणार आहेत. त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील मराठा बांधव जिवनाश्यक वस्तूंसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.
अहमदनगरला उद्या मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी यात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेचा दुसरा मुक्काम अहमदनगर शहराशेजारी असलेल्या बाराबाभळी परिसरामध्ये असणार आहे. यामुळे मराठा बांधवांनी बाराबाभळी परिसरात संपूर्ण तयारी केली आहे. जवळपास दीडशे एकरचा परिसर मुक्कामासाठी ठेवला आहे. या परिसरातील साडेचारशे एकरवर पार्किंगची व्यवस्था केली आहे.