‘काय राव जरांगेंनी काय माल पटवलाय पिंपरी चिंचवडचा…’, बारस्करांनी फोडला मोठा बॉम्ब, म्हणाले …तर मी ऑडिओ क्लिप पोलिसांना देणार
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप सादर केली आहे. या ऑडिओ क्लिपनंतर आता अजय बारस्कर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात बोलताना पाचशे कोटी रुपयांसंदर्भात मोठा आरोप केला होता. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा असं देखील म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत हे पैसे देण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. या ऑडिओ क्लिपने आता चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर अजय बारस्कर यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाले बारस्कर?
आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, पण डोंगर पोखरून उंदिर काढला. अशी फडतूस क्लिप दाखवण्यामागे मनोज जरांगे पाटील यांचा नेमका हेतू आहे तरी काय? मग आठ महिने त्यांनी ही ऑडिओ क्लिप का दाखवली नाही? असा सवाल यावेळी अजय बारस्कर यांनी केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप देखील केले आहेत.
‘मनोज जरांगेंबद्दल माझ्या फोनमध्येही एक क्लिप आहे, तुम्ही जशी क्लिप दाखवलीना तशीच एक क्लिप माझ्या मोबाईलमध्ये देखील आहे. मनोज जरांगेंचे दोन मित्र आहेत, ते जरांगे पाटलांच्या खूप जवळचे मित्र आहेत. आता मी हे नाही सांगत ते कुठे राहतात, त्याचं नाव काय? या ओडिओ क्लिपमध्ये ते दोघेजण चर्चा करत आहेत. ते कुजबुजत नाहीत, चर्चा करत आहेत, आणि त्यांची काय चर्चा सुरू आहे, ते मी सांगतो. या क्लिपमध्ये ते दोघे म्हणतात काय राव जरांगेंनी काय माल पटवलाय, पिंपरी चिंचवडमधला माल आहे. हे कोण बोलतंय तर मी नाही बोलत जरांगे पाटील यांचे मित्र बोलत आहेत. बंद खोलीमध्ये रात्रभर तुम्ही नेमकी काय चर्चा करता? तुम्ही एकत्र फिरता, तुमच्या दौऱ्यामध्ये देखील ते असतात. तुम्ही पुण्यामध्ये आलात, रायगडला गेलात तर ते तुमच्यासोबत असतात. माझ्याकडे क्लिप आहे. तुम्ही माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, मग मी ही ऑडिओ क्लिप पोलिसांना देतो, असंही यावेळी बारस्कर यांनी म्हटलं आहे.
