Rohit Pawar-Supriya Sule : राष्ट्रवादीत अंतर्गत काहीतरी मोठं घडतय, रोहित पवारांच्या गुप्त बैठकीवर अखेर अनिल देशमुखांच्या मुलाने दिलं स्पष्टीकरणं
Rohit Pawar-Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुखने स्पष्टीकरणं दिलं आहे.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. रोहित पवार यांच्या नागपूरमधील मोर्चांवरुन पक्षात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. रोहित पवार यांच्या मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रोहित पवारांनी नागपूरमधील पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे. यावर आता अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख बोलले आहेत. ते विदर्भाचे असून रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. “विनाकारण संभ्रमाचं वातावरण तयार केलं जात आहे. कुठलाही गोंधळ नाही. माध्यमांमध्ये मुद्दामून खोडकरपणा केला आहे. दुष्काळाची परिस्थिती विदर्भात आहे. विदर्भात अधिवेश होत आहे. विदर्भातील प्रश्न कसे मांडले. त्या संदर्भात बैठका घेतल्या होत्या” असं स्पष्टीकरण सलील देशमुख यांनी दिलं आहे.
“26 तारखेला उद्याचं बैठक होत आहे. त्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया ताई,रोहित भय्या येणार आहेत. आपली व्यूहरचना काय असली पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मांडायचे या संदर्भात उद्याची बैठक ठेवली आहे. आपल्या जिल्ह्यातले पदाधिकारी, त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काय विचारपूस केली या बद्दल चर्चा होणार आहे” असं सलील देशमुख म्हणाले.
त्यांना वस्तूस्थिती सांगणं हे आमचं काम
“सुप्रिया ताईंची नाराजी अजिबात नाही. नाराजी कसली, सोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय. आमच्यासारखा पक्ष नसेल, आमच्यात एकमत आहे. MPSC चा मोर्चा झाला, त्यावेळी सुप्रिया सुळे तिथे गेल्या. रोहित पवारांचा पंढरपूरला मोर्चा होता, तेव्हा शशिकांत शिंदे तिथे गेलेले” अशी सलील देशमुख यांनी बाजू मांडली. तुम्ही रोहितदादांचे निकटवर्तीय आहात, यावर सलील देशमुख म्हणाले की, “मला एक सांगा नागपूरमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी येतात, तेव्हा त्यांच्यासोबत काम करणं, चर्चा करणं, त्यांना वस्तूस्थिती सांगणं हे आमचं काम आहे”
“उद्या सुप्रिया सुळे आल्या, शशिकांत शिंदे साहेब आले, राष्ट्रवादीचे जे जे पदाधिकारी येतात, त्यांच्यासाठी नियोजन केलेलं असतं” असं सलील देशमुख म्हणाले.