
K. Annamalai On Raj Thackeray : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहे. फक्त काही तास महापालिका निवडणुकीसाठी उरले आहेत. यामध्ये अनेक नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या. यामधील सर्वात चर्चेत आलेली सभा म्हणजे राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे झालेली सभा. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपसह इतर काही नेत्यांवर देखील हल्लाबोल केला. यामधील सर्वात चर्चेत आला तो विषय म्हणजे राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर केलेली टीका. या टीकेनंतर चांगलच वातावरण तापलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या ‘रसमलाई’ या वादग्रस्त वक्तव्यावर अन्नामलाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी मुंबईला येईन, माझे पाय कापून दाखवा’ असे आव्हान अन्नामलाई यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
अन्नामलाई यांनी राज ठाकरे यांचे वक्तव्य तमिळ लोकांचा अपमान करणारे असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मुंबई ही खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्या नाराज पक्षसहकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी, राज ठाकरे यांचे वक्तव्य फार गंभीरपणे घेऊ नका असे विधान केले.
मुंबईवरून राजकीय वाद
हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मुंबईतील आगामी महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्नामलाई यांनी वक्तव्य केले. त्यांनी म्हटले होते की, ‘मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर ती देशाची आर्थिक राजधानी आणि एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे हे शहर योग्य लोकांनी चालवले गेले पाहिजे.
मुंबईला ट्रिपल-इंजिन सरकारची गरज आहे. मुंबईत भाजपचा महापौर, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असणे आवश्यक आहे. मुंबई हे जागतिक महानगर असून तिचा अर्थसंकल्प 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. बेंगळुरूचा अर्थसंकल्प सुमारे 19 हजार कोटी तर चेन्नईचा 8 हजार कोटी रुपयांचा आहे. इतक्या मोठ्या अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनात सक्षम आणि प्रामाणिक लोकांची गरज आहे असं अन्नामलाई यांनी म्हटले होते.
अन्नामलाईच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांची टीका
अन्नामलाई यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यात राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या जुन्या घोषणांची आठवण करून देत अन्नामलाई यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘एक रसमलाई तमिळनाडूतून आली आहे… तुझा इथे काय संबंध? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ अशी टीका राज ठाकरेंनी केली.