ती कुठे लपून बसलीय हे तोच सांगू शकतो…लिंगपिसाट खरात विरोधात कोर्टात जोरदार युक्तिवाद; काय काय घडलं?

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात सध्या एसआयटी पथकाच्या ताब्यात असून त्याला आज राहाता कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला राहाता कोर्टाने ९ मेपर्यंत चार दिवसांची कोठडी दिली आहे.

ती कुठे लपून बसलीय हे तोच सांगू शकतो...लिंगपिसाट खरात विरोधात कोर्टात जोरदार युक्तिवाद; काय काय घडलं?
ashok and kalpna kharat
| Updated on: May 05, 2026 | 8:03 PM

नाशिकच्या  भोंदू अशोक खरात याला आज राहाता कोर्टात बंदोबस्तात हजर करण्यात आले.  यावेळी खरात याच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी शिर्डी पोलिसांनी राहाता कोर्टात केली. मात्र, न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. शिर्डीतील जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता चार दिवस आरोपीची पोलिस कसून चौकशी करणार आहेत. खरात याची पत्नी कल्पना खरात हीचा शोध सुरु आहे. इतर दोन आरोपीचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे.

राहाता कोर्टात आज आरोपी भोंदू अशोक खरात याला सादर करण्यात आले. आज न्यायाधीश यांच्यासमोर भोंदू खरात याला हजर करण्यात आले. शिर्डी पोलिसांनी भोंदू खरात याची सात दिवसांची पोलिस कोठडी कोर्टाला मागितली.शिर्डी पोलिसांच्या वतीने तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी युक्तीवाद केला. यावेळी न्यायाधीशांसमोर भोंदू अशोक खरात खाली मान घालून स्तब्ध उभा होता. न्यायाधीशांनी भोंदू खरात याला विचारले काही सांगायचे आहे का ? भोंदू खरात याने मान हलवत नकार दिला. सरकारी पक्षाच्या वतीने वकील गौरव बोर्डे यांनी युक्तिवाद केला.

यावेळी युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे आम्हाला आरोपीची नीट चौकशी करायची आहे. जमीन खरेदी केली तेव्हा पैसे कुठून मिळाले. याचा तपास करायचा आहे. व्याजाचे पैसे कोणी कोणी वाटून घेतले याचाही तपास करायचा असल्याचे कोर्टाला सरकारी पक्षाने सांगितले. एकूण १४ व्यवहार करण्यात आले. त्यात ५ कोटी ५२ लाखांचे व्यवहार आहेत. फसवणूक केल्याचा उद्देश स्पष्ट होतो. त्याची पत्नी कल्पना खरात कुठे राहू शकते याबाबत विचारणा करण्यासाठी अशोक खरात याची कोठडी पाहिजे अशी मागणी तपासअधिकारी निवांत जाधव यांनी केली.

आरोपींनी कशा पद्धतीने हे व्यवहार केले. एवढी मोठी रक्कम जमीन घेण्यासाठी कुठून आणली.याचा तपास करण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील ॲड.गौरव बोर्डे यांनी केली. अशोक खरात नॉमिनी असलेली बरीच खाते विविध पतसंस्थांमध्ये सापडली आहेत, त्यात बरेच व्यवहार झाले आहेत.याचा देखील तपास करायचा आहे. व्याजाचे पैसे मिळवण्यासाठी या आरोपीने आणि त्याच्या पत्नीने जाणीवपूर्वक फिर्यादी जमीन मालकाची फसवणूक केल्याचे सरकारी वकील ॲड. गौरव बोर्डे यांनी सांगितले.

आरोपी खरातच्या वकिलांचा युक्तिवाद

फिर्यादी जमीन मालकाने गुन्हा दाखल करायला एवढा उशीर का केला. फिर्यादीने अनेक पतसंस्था आणि बँकांकडून कर्ज घेतलं आहे आणि एकही कर्ज त्यांनी फेडलेले नाही. ५ कोटी ५२ लाखाला व्यवहार ठरला होता आणि ही रक्कम फिर्यादीच्या खात्यात अशोक खरात याने वर्ग केल्याचे आरोपीचे वकीलांनी युक्तीवाद करताना सांगितले. फिर्यादीतील सर्व मजकूर हा बनवले वाटतो आहे. खरात यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया फिर्यादी याला विश्वासात घेऊन शिर्डी पोलिसांत करण्यात आली आहे. फिर्यादी याच्या जमीन व्यवहारामध्ये बळजबरी करीत कोणत्याही सह्या आरोपीने घेतल्या नाहीत असा युक्तीवाद बचाव पक्षाने केला आहे.

कल्पना खरात कुठे आहेत ?

शिर्डी पोलिसांना कल्पना खरात सापडत नाही, म्हणून कल्पना खरात या फरार आहेत, असे शिर्डी पोलिस म्हणत आहे. १८ मार्चपासून आरोपी अशोक खरात हे SIT पथकाच्या ताब्यात आहे आणि शिर्डी येथे ३१ मार्चला गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे. त्यामुळे कल्पना खरात या कुठे आहेत हे अशोक खरात हे कसं सांगू शकतील? ते तर गेल्या १८ तारखेपासून कोर्टाच्या ताब्यात आहेत असा युक्तीवाद बचाव पक्षाने केला आहे. हा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अशोक खरात याला ९ मेपर्यंत चार दिवसांची कोठडी दिली आहे.

Follow Us